Sat, Mar 23, 2019 18:08होमपेज › Belgaon › ‘मराठी’ची सरशी

‘मराठी’ची सरशी

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 03 2018 11:05PMबेळगाव : प्रतिनिधी

तालुका पंचायत सर्वसाधारण बैठकीत आज पुन्हा मराठी कागदपत्रांच्या मुद्द्यावरून मोठा वादंग झाला. मात्र, म.ए.समितीच्या सदस्यांनी घेतलेल्या रोखठोक भूमिकेमुळे अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांना अखेर नमते घेऊन मराठी कागपत्रांचा ठरावा संमत करावा लागला. पुढील बैठकीत मराठी कागदपत्रे देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

म.ए.समितीच्या तालुका पंचायत  सदस्यांनी गेल्या दोन वर्षांपासून सभागृहात देण्यात येणारे बैठकीचे इतिवृत, नोटीस, यासह आवश्यक कागदपत्रे मराठीत देण्यात यावीत, अशी मागणी लावून धरली आहे. मात्र, अनेकवेळा केवळ आश्‍वासने देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला. सदस्य सुनील अष्टेकर व सहकार्‍यांनी ता.पं. कार्यकारी अधिकारी एस. के. पाटील यांची भेट घेऊन शुक्रवारच्या बैठकीत कागदपत्रे मराठीत देण्याची सूचना केली होती. त्यानुसार बैठकीत प्रारंभीच मराठी सदस्यांनी मराठी कागदपत्रांचा मुद्दा चर्चेला घेतला.  त्यांनी न्यायालयाचा निकाल सादर करून सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडले. 

न्यायालायाने मराठीमध्ये कागदपत्रे देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार आपण मागणी करत आहोत, असे मराठी सदस्यांनी ठासून सांगितले. रावजी पाटील, अष्टेकर, अप्पासहेब किर्तने, नारायण नलवडे, वसंत सुतार, उदय सिद्धन्‍नावर यांनी जोरदार आवाज उठवला. त्यामुळे अखेर कागदपत्रे मराठीतूनही देण्याचा ठराव संमत झाला. पुढच्या बैठकीपासून सारी कागदपत्रे कन्नडबरोबर मराठीतही देण्याची ग्वाही अध्यक्षांनी दिली.ता. पं. सभागृहात बैठक झाली. अध्यक्षस्थानी शंकरगौडा पाटील होेते.व्यासपीठार उपाध्यक्ष मारुती सनदी कार्यकारी अधिकारी एस.के.पाटील होते.

निधी प्रश्‍न मार्गी

विकासनिधीच्या वितरणावरूनही सदस्यांमध्येही मतभेद निर्माण झाल्याने निधी अनेक महिन्यांपासून पडून होता. स्वतः जास्त निधी हवा, अशी अध्यक्षांची मागणी होती; पण सदस्यांनी विरोध केला होता. विरोधी सदस्यांसह सत्ताधारी गटातील सदस्यांनीही अध्यक्षांच्या मागणीला आक्षेप घेतला होता. शुक्रवारच्या बैठकीत सदर निधी सर्व सदस्यांना समप्रमाणात वाटप करण्याचा घेण्यात आला. त्यामुळे निधी वाटपाची कोंडी फुटली आहे. सरकारकडून आलेले निधी 1 कोटी, एसटीपी 16 लाख, स्टँप ड्युटी 86 लाख असा एकूण 2 कोटींचा निधी 45 सदस्यांना समप्रमाणात वाटण्याचा निर्णय झाला.