Mon, Apr 22, 2019 03:58होमपेज › Belgaon › मेळाव्यातून होणार युवा आघाडी ‘चार्ज’

मेळाव्यातून होणार युवा आघाडी ‘चार्ज’

Published On: Jan 05 2018 1:05AM | Last Updated: Jan 04 2018 8:38PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीने युवा दिनी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामुळे 12 रोजी तालुक्यातील मराठी युवक एकवटणार आहेत. यातून युवा आघाडी चार्ज होणार असून नव्या युवकांना सक्रिय करण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.

मागील काही दिवसांपासून तालुक्यात युवा मेळावा घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासाठी युवा दिनाचा मुहूर्त निश्‍चित झाला असून बेनकन्नहळ्ळी येथे मेळावा होणार आहे. युवा आघाडीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून युवादिनी मेळावा घेण्याच्या पायंडा पडला आहे. मागील वर्षी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुका असल्यामुळे मेळावा होऊ शकला नाही. यावर्षी पुन्हा एकदा मेळावा आयोजनाची घोषणा केली आहे. त्यातून तालुक्यात युवा आघाडी सक्रिय होणार आहे.

येत्या विधानसभा निवडणुकांचा फड येत्या काळात रंगणार आहे. यासाठी राजकीय पक्ष सक्रिय झाले   आहेत. युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात येत आहेत. यासाठी सर्व प्रकारचा मुक्त वापर करण्यात येत असून मराठी युवकांना गळी लावण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत.

सध्या तालुक्यातील युवा आघाडीला सक्रिय करण्याचे प्रयत्न समिती नेतृत्वाकडून सुरू आहेत. मागील महिन्यात नावगे येथे युवा कार्यकर्त्यांची याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी युवकांचा कानोसा घेण्यात आला. उपस्थित युवकांनी मराठीच्या लढ्यासाठी युवकांना संघटित करण्याची हाक दिली. त्या माध्यमातून युवा मेळावा घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

तालुक्यातील गावोगावी युवा आघाडीच्या शाखा सुरू आहेत. युवक म. ए. समितीच्या झेंड्याखाली एकवटत आहेत. मध्यंतरी युवा आघाडीचे काम थंडावले होते. त्यामुळे नवीन युवकांना संघटनेत सक्रिय करण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. मेळावा जाहीर केल्यामुळे म. ए. समितीच्या चळवळीत उत्साह संचारला असून नवी ऊर्जा निर्माण झाली.

युवा आघाडीने कार्यकर्त्यांची नवी फळी तयार करण्यात सुरुवातीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे सातत्य राखण्यासाठी येत्या काळात अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

येत्या काळात मेळाव्याच्या प्रचारासाठी गावागावांतून जागृती करण्यात येणार आहे. मेळाव्याला महाराष्ट्रातील वक्त्यांना निमंत्रित करण्यात येणार असून त्यामाध्यमातून युवकांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम होणार आहे.