Wed, Jul 24, 2019 12:07होमपेज › Belgaon › दगाबाजांपासून बोध घ्या, कामाला लागा : एन. डी. पाटील

दगाबाजांपासून बोध घ्या, कामाला लागा : एन. डी. पाटील

Published On: May 26 2018 1:49AM | Last Updated: May 25 2018 11:41PMबेळगाव, कोल्हापूर : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीला कुणी दगाफटका केला हे समजून घ्या, बोध घ्या आणि लवकरात लवकर मध्यवर्ती म. ए. समिती व घटक समित्यांची संयुक्त बैठक घेऊन कामकाजाला सुरुवात करा, अशी सूचना भाई डॉ. एन. डी. पाटील यांनी मध्यवर्तीच्या म. ए. समितीच्या पदाधिकार्‍यांना केली.

मध्यवर्तीच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी कोल्हापुरात डॉ. पाटील यांची भेट घेऊन विधानसभा निकालावर चर्चा केली. त्यावेळी डॉ. पाटील म्हणाले,  गेली 62 वर्षे महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभागाचा समावेश महाराष्ट्रात व्हावा, यासाठी केंद्र व कर्नाटक सरकारबरोबर लढा देत आहे. याचा एक भाग म्हणून सीमाभागातील जनता विधानसभा, जिपं. तापं. महानगरपालिका, ग्राम पंचायत, एपीएमसी निवडणूक लढवित आली आहे. परंतु निवडणुका हे साध्य नसून साधन आहे. विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीचे उमेदवार पराभूत झाले तरी समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाउमेद न होता सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी व सर्वोच्च न्यायालयातील कोर्ट कामकाजासाठी सदैव तयार रहावे. 

तज्ञ समितीची बैठक

लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीची बैठक बोलावून सीमाभागातील पदाधिकारी, घटक समिती, कार्यकर्त्यांना सीमाखटल्याबाबत तसेच पुढील कामकाजाबाबत माहिती देण्यात येईल, असेही डॉ. एन. डी. पाटील यांनी यावेळी सांगितले.

मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दिपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी आमदार अरविंद पाटील, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, महाराष्ट्र सरकारचे सेवानिवृत्त अधिकारी दिनेश ओऊळकर व सुनील आनंदाचे उपस्थित होते. सुरुवातीला विधानसभा निवडणुकीत जे काही घडले या संदर्भात माजी आमदार अरविंद पाटील, मरगाळे,  दळवी यांनी सविस्तर माहिती पाटील यांना दिली. 

किणेकरांचा राजीनामा नामंजूर

मनोहर किणेकर यांनी तालुका म. ए. समिती कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची काहीही गरज नाही. तालुका म. ए. समिती कार्यकर्ते आणि मध्यवर्ती म. ए. समिती यांच्याबरोबर कोर्ट कामकाज व रस्त्यावरची लढाई यासाठी किणेकर यांनी काम करावे, अशी सूचना डॉ. एन. डी. पाटील यांनी केली.