Wed, Apr 24, 2019 08:07होमपेज › Belgaon › बाजारपेठेचा अभ्यास करून पिके घ्या

बाजारपेठेचा अभ्यास करून पिके घ्या

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 06 2018 11:01PM

बुकमार्क करा
उचगाव: वार्ताहर

प्रत्येक तीन वर्षांतील एक वर्ष एक वर्ष शेतकर्‍याला तोट्याचे असते. शेतकर्‍यांच्या तीन वर्षांचा ताळेबंद विचारात घेऊन उत्पन्नाच्या दीडपट हमीभाव सरकारने जाहीर केला पाहिजे. शेतकरी संघटित झाला पाहिजे. पिकविलेल्या मालावर प्रक्रिया करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आजच्या पिढीने बाजारपेठेचा  अभ्यास करून पिके घेतली पाहिजे, असे खा. राजू शेट्टी म्हणाले.

सुळगा (हिं.) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघाच्या नूतन इमारतीचे व शेतकरी मेळाव्याचे  उद्घाटन करून ते बोलत होते.

प्रारंभी, ईशस्तवन स्वागतगीत ब्रम्हलिंग हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केले. बेळगुंदी येथील भावना दातार आणि सहकार्‍यांनी स्फूर्तिगीत तर शाहीर शिवाजी चंदगडकर यांनी पोवाडा सादर केला. प्रमुख सभागृह, संगणक विभाग, कॅश काऊंटर आदींचे उद्घाटन खा. शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. नामफलक व सभागृहाचे उद्घाटन महापौर संज्योत बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन खा. शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अशोक पाटील यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

प्रमुख वक्ते मनोज पावशे यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. शेतकर्‍यांच्या व्यथा मांडताना ते म्हणाले, आजचा शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. एकीकडे बलाढ्य लोकप्रतिनिधी शेतकर्‍यांच्या  पिकाऊ जमिनी कवडीमोल दराने खरेदी करून कोट्यवधी रु. ना विक्री करत आहेत. विधानसौध, सांबरा विमानतळ या जमिनी शेतकर्‍यांवर अन्याय करून कवडीमोल दराने व  नोकरीची आश्‍वासने देऊन सरकारने हडप केल्या आहेत. त्यामुळे आज शेतकरी रस्त्यावर येत आहे. आपल्यावरील अन्यायाविरोधात शेतकर्‍यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. यावेळी एपीएमसी चेअरमन निंगाप्पा जाधव, जि. पं. सदस्य मोहन मोरे यांनीही विचार मांडले.

उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच सीमासत्याग्रही आणि हुतात्मा झालेल्यांच्या वारसांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संचालक, सल्लागार, कर्मचारी वर्गाचा सत्कार खा. राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला विविध संघसंस्थांचे प्रतिनिधी, शेतकरीबांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. पुंडलिक पावशे यांनी आभार मानले.