Sat, Aug 24, 2019 18:51होमपेज › Belgaon › ‘उत्तर’ घ्या, प्रश्‍न सोडवा

‘उत्तर’ घ्या, प्रश्‍न सोडवा

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:31AMबेळगाव : प्रतिनिधी

मध्यवर्ती म.  ए. समितीने जाहीर केलेल्या उमेदवाराविरोधात प्रत्येक मतदारसंघात बंडखोरांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. यामुळे मराठी मतांचे विभाजन होण्याचा धोका निर्माण झाला असून बंडखोरांना उत्तर मतदारसंघ देण्यात यावा, अन्यत्र मध्यवर्ती म. ए. समितीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात यावा. याप्रकारे एकीचा गुंता सोडविण्याची मागणी होत आहे.

बेळगाव दक्षिण, ग्रामीण आणि खानापूर मतदारसंघातून मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने अनुक्रमे प्रकाश मरगाळे, माजी आ. मनोहर किणेकर व आ. अरविंद पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याविरोधात बंडखोर उमेदवार उभे आहेत. परिणामी बंडखोरांनी माघारी घ्यावी अशी मराठी भाषिक मतदारांतून मागणी होत आहे.मध्यवर्तीने जाहीर केलेल्या उमेदवारांना अनेक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या उमेदवारांचा सीमाप्रश्नाच्या लढाईत आणि संघटनात्मक बांधणीत महत्त्वाचा वाटा आहे. तरीदेखील त्यांना काहीजण केवळ व्यक्तीद्वेषातून विरोध करत आहेत.

बंडखोरी करून उभारलेल्या उमेदवारापैकी खानापूर मतदारसंघातील विलास बेळगावकर वगळता अन्य उमेदवारांचे सीमालढ्यातील योगदान कितपत आहे, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, केवळ मराठी भाषिकांच्या संघटनेत खीळ घालण्याच्याएकमेव उद्देशाने बेकी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिकृत उमेदवारांना मागील आठ दिवसांपासून सुरू असणार्‍या प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. तर बंडखोरांना ठिकठिकाणी रोखण्यात येत असून प्रवेशबंदी करण्यात येत आहे. काही भागातून या गटाच्या म्होरक्याला आपल्या कार्यकर्त्यांना मागे ठेवून धूम ठोकावी लागली आहे. यातून त्यांचे जनतेत असणारे चित्र स्पष्ट होत आहे.

मराठी जनतेच्या हितासाठी एकी महत्त्वाची आहे. बंडखोर उमेदवारांनी बंडाचे निशाण वेळीच म्यान केल्यास सीमाभागात किमान तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, याचे भान नसलेल्यांकडून एकीच्या नावाखाली अडथळा उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठी मतांचे विभाजन करून त्याचा फायदा राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना करून देण्यात येणार आहे.मध्यवर्ती म. ए. समितीने उत्तर मतदारसंघातून उमेदवार दिलेला नाही. यामुळे याठिकाणी बंडखोरांनी आपली ताकद पणाला लावून झुंज देणे अपेक्षित आहे. उर्वरित ठिकाणी मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार मराठी जनतेच्या पाठिंब्यावर विजय खेचून आणतील. बंडखोरांनी आपले उमेदवार मागे घेऊन केवळ उत्तर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याची मागणी होत आहे. बंडखोरांनी माघार घेतल्यास मराठी मतांचे विभाजन टळून समितीचा उमेदवार सहजगत्या विजयी होईल. यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.