Thu, Apr 18, 2019 16:07



होमपेज › Belgaon › औषध फवारणी करताना घ्या दक्षता

औषध फवारणी करताना घ्या दक्षता

Published On: Aug 02 2018 1:55AM | Last Updated: Aug 01 2018 7:38PM



बेळगाव : प्रतिनिधी

शेतीतील पिके चांगली व्हावीत, उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शेतकर्‍यांकडून पिकांवर विविध प्रकारची औषध फवारणी करण्यात येते. मात्र, ही फवारणी करताना शेतकर्‍यांकडून योग्य ती काळजी घेतली जात नाही. कीटकनाशक नाक, तोंडावाटे शरीरात गेल्याने धोका उद्भवतो. यासाठी फवारणी करताना योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे.

तालुक्यात बहुतांश शेतीची कामे आटोक्यात आली आहेत. शेतीतील पिकावर रोग पडू नये यासाठी औषधांची फवारणी करण्यासाठी शेतकर्‍यांनी जोर दिला आहे. मात्र अनेक शेतकर्‍यांना फवारणी करताना दक्षतेबद्दलची माहिती नसल्याने आरोग्याला धोका संभवतो. कृषी विभागानेही जागृतीसाठी दुर्लक्ष केले आहे. याचा त्रास शेतकर्‍यांना होऊ शकतो. यापूर्वी कीटकनाशक औषध फवारणी करताना विषबाधा होऊन अनेक शेतकर्‍यांना  जीव गमवावा लागला आहे. 

अप्रमाणित कीटकनाशक किंवा दोन रसायनांचे मिश्रण करणे यातून मोठे धोके आहेत. कृषी विभागाकडून याची जागृती गावापर्यंत पोहोचत नाही. तसेच जिथे बोगस आणि अप्रमाणित उत्पादने विक्री होत आहेत, तिथे कडक कारवाई अपेक्षितपणे होत नाही. यामुळेच शेतीतला हा विषप्रयोग धोकादायक पातळीवर आहे.

पिकांवर औषध फवारणी करण्याआधी कीटकनाशक डब्यावर असलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.  औषध विक्रेत्यांने सुचविल्याप्रमाणे औषधाची मात्रा घेऊन फवारणी करावी. तसेच मिश्रण पंपात भरण्यासाठी नरसाळ्याचा वापर करावा. फवारणी करताना धूम्रपान टाळावे. नोझल बंद पडल्यास तोंडाने फुंकर मारु नये. रिकामे डबे नष्ट करावेत. विक्रेत्यांनी वैध मुदतीत असणार्‍या कीटकनाशकांची विक्री करण्याची दक्षता घ्यावी.

...अशी घ्यावी काळजी 

मिश्रण तयार करताना हातमोजे आणि तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.   वार्‍याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये.   पाऊस येण्याआधी किंवा झाल्यानंतर फवारणी करू नये.    फवारणी केल्यानंतर शेतात जाणे टाळावे.   विषबाधेचे लक्षण दिसून आल्यास प्राथमिक उपाय करावेत.    आजारी व्यक्तीने कीटकनाशकांची फवारणी करू नये.   फवारणी केल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवावेत.   फवारणी करताना अंग झाकलेले असावे.   फवारणी करताना वापरलेले कपडे किंवा वस्तू इतर कामासाठी वापरू नये.   फवारणी करताना पंपाचे नोझल शरीरापासून दूर धरावे. जेेणेकरून कीटकनाशक अंगावर पडणार नाही.