Wed, Jul 24, 2019 12:57होमपेज › Belgaon › युवक, युवतींनो अतिउत्साह, हुल्‍लडबाजी टाळा

युवक, युवतींनो अतिउत्साह, हुल्‍लडबाजी टाळा

Published On: Jul 22 2018 1:02AM | Last Updated: Jul 21 2018 9:51PMबेळगाव : प्रतिनिधी

वर्षा पर्यटनासाठी तिलारी, आंबोली, गोकाककडे पर्यटकांचा ओघ वाढत चालला आहे. हिरवा शालू पांघरलेली वनराई आणि फेसाळणारे  धबधबे पाहून पर्यटकांच्या अंगातही उत्साह संचारतो. परंतु अशावेळी अतिउत्साह जीवावर बेतू शकतो.

गेल्या काही वर्षात गोकाक, आबोली, तिलारी धबधब्यात अतिउत्साहामुळे अपघाती घडना घडल्या आहेत. मात्र, त्यापासून बोध न घेता अनेकांची हुल्लडबाजी सुरुच असते. यासाठी पर्यटकांनी संयम आणि प्रशासनाने आवश्यक ती उपाययोजना करण्याची गरज आहे. 

पंधरा दिवसापूर्वी तिलारी येथे कार दरीत कोसळून पाच पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी इटगी (ता.खानापूर) येथील युवती वर्षापर्यटनासाठी गेली असता तिचा तिलारी जलाशयात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे वर्षा पर्यटनाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. याआधी जिल्ह्यातील अनेक जणांचा वर्षा पर्यटनासाठी गेले असता अपघाती मृत्यू झाला आहे.  

धबधब्यावर युवक-युवती हुल्लडबाजी करत असतात. उंचावरून पडणार्‍या धबधब्यांवर मोबाईलद्वारे सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ते जीवघेणे ठरत आहे. अनेक पर्यटक मद्य घेऊन वर्षा पर्यटनासाठी जातात. अशावेळी अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी मद्यप्राशन करून पर्यटनस्थळाला भेट देणे टाळण्याची गरज आहे. प्रशासनानेही  पर्यटनस्थळांवरील सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पूर्वनियोजन आवश्यक 

बेळगाव जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहे. अनेक पर्यटन स्थळे ही धोकादायक आहेत. यासाठी धबधबा पाहायला जाताना पूर्वनियोजन असणे आवश्यक आहे. पर्यटनाचे किट, दोरी, मेडिसिन किट, खाण्याचे पदार्थ, बूट, बॅटरी, जर्कीन आदी घेणे आवश्यक आहे.

...हे टाळणे आवश्यक 

धबधब्यात, टेकडीवर सेल्फी घेणे अथवा फोटोसेशन, स्टंटबाजी करणे यामुळे दुर्घटना होऊ शकते. पावसाळ्यात सेल्फी काढणे जीवघेणे ठरू शकते. पाण्यातील दगडावर शेवाळ साचल्याने ते निसरडे असतात. तसेच पाण्याचा प्रवाह वेगाने असतो. यामुळे अतिउत्साह दाखविणार्‍या युवकांना रोखणे आवश्यक आहे. 

पोलिस बंदोबस्त, सुरक्षा फलक गरजेचे

पावसाळ्यात चार महिन्याच्या काळात मोठ्या प्रमाणात वर्षा पर्यटन केले जाते. पर्यटनस्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक पर्यटन पॉईंटवर पोलिस बंदोबस्त असणे आवश्यक आहे. अनेक  पर्यटन स्थळावर सुरक्षा फलक नसल्याने संबंधित ठिकाणचा अंदाज येत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासाठी सुरक्षा फलकही तितकाच गरजेचा आहे. 

पर्यटन खात्याचे दुर्लक्ष

बेळगाव जिल्ह्यात अनेक वर्षा पर्यटन स्थळे आहेत. गोकाक, गोडचिनमलकी, सौंदत्ती, राकसकोप आदी ठिकाणच्या विकासाकडे व सुरक्षेकडे पर्यटन खात्याचे दुर्लक्षच दिसून येत आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे पर्यटकांना आपला जीव गमवावा लागत आहे. विकासाला प्राधान्य देऊन  पर्यटन खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे.