होमपेज › Belgaon › स्वामी विवेकानंद यांच्या बेळगावात पाऊलखुणा

स्वामी विवेकानंद यांच्या बेळगावात पाऊलखुणा

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 11 2018 11:59PM

बुकमार्क करा
बेळगाव : सुनील आपटे

काळोखाचा धूप जाळला
घर भरले गंधाने
वातीवरची झडुनि काजळी
अंकुरले अन् सोने

कविवर्य बा. भ. बोरकर  यांच्या ओळी स्वामी विवेकानंदांना लागू होतात. स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी केली जाते. तरुणांचे आयकॉन ठरलेले संन्यासी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील 12 दिवस बेळगावकरांसाठी अमूल्य आणि भारलेले आहेत. 16 ते 27 ऑक्टोबर 1892 च्या या काळात स्वामी बेळगावात वास्तव्यास होते. 

रिसालदार गल्‍ली राहणारे प्रख्यात वकील सदाशिव भाटे यांच्या घरी स्वामींचा मुक्‍काम होता. तीन दिवसानंतर ते किल्ल्यात वास्तव्याला गेले आणि 9 दिवस राहिले.  किल्ल्यात बंगाली फॉरेस्टर हरिपद मित्रा यांच्याकडे मुक्‍काम असताना त्यांची दिनचर्या ठरलेली होती. सकाळी ते खासबागला लागून असलेल्या जोशी मळ्यात जाऊन विहिरीत पोहायचे. तेथून ते शहापूरमधील मारुतीच्या मंदिरात आणि तेथून कपिलेश्‍वर मंदिराला जात. तेथे ध्यानधारणा झाल्यावर भक्‍तांशी चर्चा करत. त्यानंतर किल्ल्यात परतत. 

बेळगावात आल्यानंतर दोन दिवसांत त्यांची ख्याती शहरभर झाली. कोणी एक विद्वान संन्यासी किल्ल्यात आला आहे, त्याची आध्यात्मिक उंची आणि इंग्रजी प्रभुत्व असामान्य आहे, असा लौकिक पसरला होता. महाद्वार रोडला लागून काही गल्ल्या आहेत. त्यातील एका गल्‍लीत फाटक यांचे कौलारू घर होते. त्यासमोर औदुंबराचे झाड होते. त्याखाली स्वामी काही वेळ विसावत असत. स्वामींच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा, स्मृती आजही ताज्या आहेत. विवेकानंद मार्गावरील आश्रमात स्वामींनी  वापरेला पलंग, काठी आणि आरसा जपलेला आहे.