Thu, Apr 25, 2019 12:10होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्या प्रकरण : वाघमारेचे घूमजाव

गौरी लंकेश हत्या प्रकरण : वाघमारेचे घूमजाव

Published On: Jun 29 2018 12:08AM | Last Updated: Jun 28 2018 11:34PMबंगळूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर आपणच गोळ्या  झाडल्याची कबुली देणार्‍या संशयित परशुराम वाघमारेने आता ‘यू टर्न’ घेतला आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याला अटक केल्यानंतर मीच गौरी यांच्यावर गोळी झाडली, अशी कबुली त्याने दिली. होती. मात्र, न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल करण्यास नकार दिला. परिणामी, या प्रकरणाने पुन्हा नवे वळण घेतले आहे. आता एसआयटीसमोर परिस्थितीजन्य पुरावे सादर करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. 

एसआयटीने 11 जूनला वाघमारेला अटक केली. त्याने गेल्या पंधरा दिवसांत चौकशीला संपूर्ण सहकार्य करत आपणच हत्या केल्याचे सांगितले. पैशासाठी नव्हे तर गौरी लंकेश हिंदुत्वाविरोधी असल्याने ही हत्या झाल्याचे त्याने सांगितले. या कटामध्ये आणखी काहीजण सहभागी असल्याची माहिती त्याने एसआयटीपुढे सांगितली. बुधवारी  संशयितांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे 19 न्या एसीएमएम (अ‍ॅडिशनल चिफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट) न्यायालयापुढे  हजर करण्यात आले. त्यावेळी वाघमारेने हत्येबाबत कबुली देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला पुन्हा तिसर्‍या एसीएमएम न्यायालयात प्रत्यक्ष हजर करून त्याचे म्हणणे नोंद करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. त्याच्यासह सारे संशयित 11 जुलैपर्यंत ते न्यायालयीन कोठडीत असतील. 

परिस्थितीजन्य पुराव्यांचा अभाव

आतापर्यंत आपणच हत्या केल्याचे सांगणार्‍या संशयिताने अचानक फिरल्याने एसआयटीसमोर परिस्थितीजन्य पुरावे शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आता हत्या करणार्‍याने वापरलेले पिस्तूल, त्या पिस्तुलावर असणारे बोटाचे ठसे, घटनास्थळी संशयिताविरोधात मिळालेले पुरावे, एखाद्या सीसी टीव्ही कॅमेर्‍यातील संबंधित फुटेज असे पुरावे एसआयटीला शोधावे लागणार आहेत.

सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना अ‍ॅड. वेदमूर्ती म्हणाले, गौरी यांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या आणि संशयिताकडे सापडलेल्या पिस्तुलातील गोळ्या सारख्या नाहीत. त्यामुळे संशयिताने चाचणीसाठी तयारी दर्शविली आहे.