Thu, Apr 25, 2019 15:39होमपेज › Belgaon › उष्म्याची काहिली पाण्याचे दुर्भिक्ष्य

उष्म्याची काहिली पाण्याचे दुर्भिक्ष्य

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच बेळगाव जिल्ह्यात वैशाख वणवा पेटला असून उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक, जनावरे यांची काहिली होत असून नागरिकांकडून गारव्याचा शोध सुरू आहे. शहरातील तापमानाने 38 अंश तापमानाकडे झेप घेतली आहे. ते 40 अंशांपर्यंत जाण्याची भीती आहे.

बेळगाव शहरात हिरवाई झपाट्याने कमी होत आहे. वृक्षतोड वेगाने होत असून उपनगरे मोठ्या संख्येने वाढत आहेत. यामुळे हिरवाई नष्ट होऊन सिमेंटची जंगले वाढत आहेत. परिणामी एकेकाळी गरिबांचे महाबळेश्‍वर म्हणून ओळख असणार्‍या शहराची गणना उष्ण शहरामध्ये करण्यात येत आहे. मागील आठवड्यात 35 अंश तापमानापासून 38 अंशाकडे तापमानाने झेप घेतली आहे.

सध्या वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याचा फटका जनावरांनाही बसत आहे. सकाळी 10 नंतर तापमानात वाढ होत आहे. सायंकाळी 5 पर्यंत उष्णता कायम राहत असून या काळात नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत.

उष्म्यामुळे दुपारच्या वेळात बाजारपेठेतील गर्दी कमी होत आहे. नागरिक सकाळ, संध्याकाळच्या काळात खरेदीला बाहेर पडणे पसंद करत आहेत. दिवसभर अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.
जिल्ह्यातील रायबाग, अथणी, चिकोडी, हुकेरी, सौंदती, गोकाक हे जिल्हे अधिक तापमानाचे मानले जातात. याठिकाणी उष्णता अधिक प्रमाणात आढळते. तर खानापूर, बेळगाव तालुक्यात कमी प्रमाणात उष्मा असतो. 

परंतु, यावर्षी सर्वच भागात उष्णतेने कहर मांडला आहे. यामुळे नागरिकांना हैराण व्हावे लागले आहे. खानापूर आणि बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातही उष्णतेत 38 अंशापर्यंत वाढ झाल्याचे आढळत आहे.

*पंख्यांची वाढती गरज

एकेकाळी थंड हवेसाठी ख्याती असणारे बेळगाव शहर ही ओळख मागे पडत चालली आहे. पंखा, कूलर यासारख्या गोष्टींची अत्यावश्यकता भासत आहे.  परिणामी ईलेक्ट्रीकल  वस्तुंच्या दुकानातील गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. 

*पाणीपातळी

सध्या जिल्ह्यातील अनेक भागातील पाण्याची पातळी झपाट्याने घटत आहे. नाले-ओढे कोरडे पडले आहेत. नद्यामधील पाणी कमी होत चालले असून यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर पिकेही कोमेजू लागली आहेत. जनावरांच्या पाण्याची समस्यादेखील गंभीर बनली आहे. 

*निवडणुकीचीही धुमाळी

दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाला उपाययोजना करावी लागणार आहे. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे सर्वत्र निवडणूक प्रक्रियेची धामधूम सुरू झाली आहे. अधिकारी त्यातचे गुंतले आहेत. तर नेते निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. यामुळे नागरिकांना भेडसावणारी पाणी  समस्या सोडविताना अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उत्तर कर्नाटकाला ‘ताप’

बेळगाव : प्रतिनिधी

प्रखर उष्म्याच्या संकटात सापडलेले उत्तर कर्नाटकातील लोक तप्त झळांपासून बचावासाठी धडपड करीत आहेत. सूर्यदेवतेचे स्वतःचे शहर असलेल्या गुलबर्गा शहरात तर या वर्षातील सर्वाधिक 44 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले आहे, बागलकोट 43.9 अंश सेल्सियस आणि विजापूर शहराने यंदा 42.7 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले आहे. 

कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख समितीकडून (केएसएनडीएमसी) उपलब्ध आकडेवारीनुसार गुरुवारी गुलबर्गा शहरात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बागलकोटनेही या वर्षात जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान नोंदविले आहे. या  जिल्ह्याने शनिवारी 41.4 अंश सेल्सियस तापमान नोंदविले आहे. यादवाड हाही प्रखर उष्मा असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात शनिवारी 43 अंश सेल्सियस इतके तापमान होते. हे तापमान गेल्या वर्षातील सर्वाधिक आहे. 

विजापूर जिल्ह्याने या वर्षातील सर्वाधिक तापमान शनिवारी 42.7 अंश सेल्सियस इतके नोंदविले आहे. गेल्या चार दिवसांपासून विजापूर जिल्हावासीय प्रखर तापमानाशी लढा देत आहेत. कोप्पळ शहराते शनिवारचे तापमान 41.1 अंश सेल्सियस इतके आहे.  बेळगाव जिल्ह्यात 26 मार्चरोजी 40.6 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले असून या वर्षातील तापमानाचा हा उच्चांक आहे.  धारवाड जिल्हा मात्र या सर्वांशी तुलना करता काहीसा आल्हाददायक म्हणावा लागेल. या जिल्ह्यात 26 मार्च रोजी 40.3 सेल्सियस इतके तापमान नोंदविले आहे. 

नैसर्गिक आपत्ती देखरेख समितीचे संचालक श्रीनिवास रेड्डी म्हणाले की, गेल्या वर्षाशी तुलना करता उत्तर कर्नाटकातील तापमान सर्वाधिक आहे आणि याचे कारण आहे वार्‍याचा प्रवाह. राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर भारतातील अन्य राज्यातून तसेच तेलंगानामधून उष्ण वार्‍याच्या लाटा येत आहेत. यामुळे आगामी दिवसात उत्तर कर्नाटकातील उष्मा आणखी वाढणार आहे. 


  •