Fri, Jul 19, 2019 18:17होमपेज › Belgaon › उन्हाळ्यापूर्वी चार्‍याची व्यवस्था 

उन्हाळ्यापूर्वी चार्‍याची व्यवस्था 

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 9:54PMबेळगाव : प्रतिनिधी     

महाशिवरात्रीनंतर उन्हाळ्याची चाहुल लागते. खरा उन्हाळा फाल्गुन पौर्णिमेनंतर सुरू होत असला तरी उन्हाच्या झळा पंधरा दिवस अगोदरच सुरू होतात. पिण्याचे पाणी, चारा या समस्या उन्हाळ्यात प्रकर्षाने भेडसावत असतात. जनावरांना उन्हाळ्यात चारा  मुबलक मिळावा, याची दखल घेऊन पशुपालन खाते अधिकारी आतापासून कामाला लागले आहेत.

जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी चार्‍याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. याची पुनरावृत्ती होऊ नये, याची दखल पशुपालन खात्याने घेतली आहे. गावोगावी भेट देऊन तेथील चार्‍याच्या संग्रहाची माहिती शेतकर्‍यांकडून ते मिळवित आहेत. शेजारील जिल्ह्यात चारा विक्री करून जादा पैसे मिळविण्याचे प्रकार शेतकर्‍यांकडून सर्रास घडत असतात. हे रोखण्याचे प्रयत्न अधिकार्‍यांकडून सुरू आहेत.

14  लाख जनावरांना चार्‍याची व्यवस्था 

दुष्काळामुळे काही वर्षापासून जिल्ह्यात चाराटंचाई आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात 35 चारा छावण्या उभारून तेथे 9 हजार टन चारा संग्रह करून शेतकर्‍यांना वितरित करण्यात आला होता. याशिवाय विविध जिल्ह्यांमधून चारा खरेदीही करण्यात आली होती. 

जिल्ह्यामध्ये जनावरांची संख्या  14 लाखांपर्यंत असून त्यांना 17 आठवडे पुरेल इतका चारा सध्या जिल्ह्यामध्ये आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात चाराटंचाई भासणार नाही, असे सांगण्यात येत आहे. मागील वर्षी   खरीप व रब्बी हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतांश शेतकर्‍यांनी चार्‍याचा संग्रह केला आहे.

दरम्यान, सौंदत्ती, रामदुर्ग व बैलहोंगल तालुक्यातील काही गावांमध्ये चाराटंचाई भासण्याची शक्यता असल्याने येथे जनावरांना  जुलैपर्यंत चारा उपलब्ध होईल, याची दखल घेण्यात आली असल्याची माहिती महसूल व पशुपालन अधिकार्‍यांनी दिली.

एक हजार हेक्टरवर चारा उत्पादन करणार  

राज्याला सतत भेडसावणार्‍या दुष्काळामुळे दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये सरकारी फार्महाऊसमार्फत चारा उत्पादन करण्याची सूचना सरकारने केली होती. मात्र बेळगाव जिल्ह्यात फार्महाऊस नाहीत. यामुळे हिडकल व मलप्रभा धरणाच्या मागील भागामध्ये सुमारे एक हजार हेक्टर जमिनीत चारा उत्पादन करण्याचा निर्णय पशुपालन खात्याच्या अधिकार्‍यांनी घेतला आहे.