Wed, May 22, 2019 14:32होमपेज › Belgaon › भटवाड्यातील  विद्यार्थी अस्वलांच्या दहशतीखाली

भटवाड्यातील  विद्यार्थी अस्वलांच्या दहशतीखाली

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 26 2018 11:12PMखानापूर : वार्ताहर

बेळगाव-पणजी महामार्गापासून वनप्रदेशात तीन कि.मी.वर असणार्‍या भटवाडा गावाला समस्यांनी ग्रासले आहे. गावाच्या रस्त्याने अस्तित्व गमावले असून वाहतुकीची समस्या गंभीर झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांवर पयपीट करण्याची वेळ आली आहे. परिसरात दिवसाढवळ्याही अस्वलांचे दर्शन होत असल्याने विद्यार्थी दहशतीखाली असून त्यांना रोज पालकांची सोबत घ्यावी लागत आहे.
भटवाडा गाव गुंजीपासून पाच कि.मी. अंतरावर आहे. महामार्गापासून गावच्या तीन कि. मी. रस्त्याचा विकास करण्यासाठी आजतागायत एकाही लोकप्रतिनिधीने प्रयत्न केलेले नाहीत. परिणामी सध्या रस्त्यावर चिखलाचे आणि डबक्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनांचा तर प्रश्‍नच नाही. चालणेदेखील शक्य नाही. अशा परिस्थितीत गावातून गुंजी आणि खानापूरला शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी दररोज पायपीट करत आहेत. सदर रस्ता घनदाट वनप्रदेशातून जात असल्याने सकाळी 8 आणि संध्याकाळी 6 च्या सुमारास अस्वले नागरिकांच्या  दृष्टीस पडत आहेत.

काही वेळा त्यांच्या झुंडी तासन तास रस्त्यावर ठाण मांडून  असल्याचे विद्यार्थ्यांनी पाहिले आहे. काही विद्यार्थ्यांनी अस्वलांच्या भीतीने शाळेकडे पाठ फिरविली आहे. इतर विद्यार्थी दररोज जीव मुठीत धरून पायपीट करत आहेत. अलिकडेच अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याने गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच घरी आणण्यासाठी पालकांना दररोज निघावे लागत आहे. शेतीचे कामे टाकून दररोज अशी पायपीट करावी लागत असल्याने शेतकर्‍यांसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत.