Tue, Jun 02, 2020 20:21होमपेज › Belgaon › विद्यार्थी उत्तर भारतात, हजेरी टिळकवाडी शाळेत!

विद्यार्थी उत्तर भारतात, हजेरी टिळकवाडी शाळेत!

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 11:49PMबेळगाव : प्रतिनिधी 

टिळकवाडीमधील सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक 9 मधून शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांची हजेरी अजूनही भरली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर भारतातील सातवी आणि आठवीमध्ये शिकणारे विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी जाऊनही त्यांची हजेरी भरली गेली आहे. 

सदर विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना उत्तर भारतातील त्यांच्या मूळगावी शिक्षणासाठी पाठविले आहे. असे असतानाही पटसंख्या दाखविण्यासाठी सदर विद्यार्थ्यांची हजेरी दाखविण्यात आली आहे. यामध्ये नवी दिल्ली येथील संध्या आणि राखी मिश्रा या दहावीमध्ये शिकणार्‍या तसेच सातवीमध्ये शिकणारे सिकंदर यादव हा बिहारचा व उत्तर प्रदेशामधील निकेश यादव यांचा समावेश आहे. 

या विद्यार्थ्यांचे पालक नोकरी, व्यवसायानिमित्त बेळगावला आले होते. त्यांनी आपल्या मुलांना टिळकवाडी येथील सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक 9 मध्ये दाखल केले होते. मात्र, शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर या चारही विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना परत त्यांच्या मूळगावी पाठविले. या विद्यार्थ्यांचे दाखले मागूनही त्यांना ते मिळाले नाहीत.

याबाबत चाईल्ड हेल्प लाईनकडे तक्रार करण्यात आल्यानंतर अधिकार्‍यांनी शाळेला भेट दिली असता सदर विद्यार्थी याच ठिकाणी असल्याचे दाखविण्याबरोबर परीक्षेला बसल्याचेही दाखविण्यात आले आहे. 
अमित मिश्रा या पालकाने याबाबत बोलताना आपण कित्येक वेळा शाळेला भेट देऊनही दाखला देण्यात आला नसल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून 65 पैकी 15 विद्यार्थ्यांनी शाळेला जाणे बंद केले आहे.  मुख्याध्यापक आणि सहशिक्षकांनी याबाबत चौकशी करणे गरजेचे आहे. याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, असे क्‍लस्टर रिसोर्स अधिकारी गिरीष जगजंपी यांनी सांगितले.