Mon, Aug 19, 2019 06:57होमपेज › Belgaon › स्वातंत्र्यदिन तोंडावर, निम्मे विद्यार्थी बुटांविना!

स्वातंत्र्यदिन तोंडावर, निम्मे विद्यार्थी बुटांविना!

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 12 2018 10:30PMखानापूर : प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिन दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र तालुक्यातील निम्म्या सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना अजूनही बूटभाग्य पदरी पडले नसल्याने जुन्या बुटांनीच स्वातंत्र्यदिनाला हजेरी लावावी लागणार आहे. आधी निधी वितरणातील घोळ आणि यानंतर अधिकारी, मुख्याध्यापक आणि शाळा सुधारणा समिती यांच्यातील समन्वयाचा अभाव यामुळे बूट वितरणास दिरंगाई झाल्याने पालकवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

बूट खरेदीसाठी शाळांना आवश्यक अनुदान मंजूर झाले खरे. मात्र सदर अनुदान खात्यावर जमा करताना अदलाबदली झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यासंदर्भात सीआरपी अधिकार्‍यांची बैठक घेऊन प्रत्येक शाळेतील विद्यार्थी संख्या आणि आवश्यक अनुदान याबाबत माहिती जमवून वितरणातील दोष दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले.

या प्रक्रियेसाठी पंधरा दिवसाचा कालावधी लोटल्याने प्रत्यक्ष रक्कम खात्यावर जमा होण्यास विलंब झाला. आता प्रत्येक शाळेच्या आवश्यकतेनुसार एसडीएमसीच्या खात्यावर बूट खरेदीसाठी लागणारा निधी जमा करण्यात आला आहे. खरेदीची प्रक्रिया पारदर्शक आणि योग्यरीतीने होण्यासाठी चार जणांच्या कमिटीच्या देखरेखीखाली सर्व व्यवहार पार पाडण्याची सूचना मुख्याध्यापकांना करण्यात आली आहे. त्यानुसार एसडीएमसी अध्यक्ष, मुख्याध्यापक, एक सहशिक्षक आणि एक विद्यार्थी अशा चार जणांच्या देखरेख समितीद्वारे खरेदी प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे.

तीन विके्रत्यांकडून कोटेशन मागवून यापैकी सर्वात कमी दर असलेल्याकडून बुटांची खरेदी करण्याची आवश्यकता आहे.  पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 265 रु. तर सहावी, सातवी, आठवीसाठी 275 रु. याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. शाळांकडून शक्यतो लिबर्टी आणि लान्सर या कंपन्यांचे बूट खरेदी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक जोड बूट आणि दोन जोड सॉक्स खरेदी करावे लागणार आहेत.

स्वातंत्र्यदिन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने मुख्याध्यापक व एसडीएमसी अध्यक्ष यांची बूट खरेदीसाठी धावपळ उडाल्याचे दिसून येत आहे.मागील वर्षी बूट खरेदीसाठी काही शाळांना अनुदान कमी पडले होते. यामुळे शाळेच्या अनुदानातून फरक रक्कम खर्ची पडली आहे. शाळांनी खर्च केलेली वाढीव रक्कम अजून जमा झाली नाही. सदर शिल्लक रक्कम त्वरित जमा करण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे.