Sun, May 26, 2019 16:53होमपेज › Belgaon › काजू क्षेत्रवाढीसाठी हवे ठोस धोरण!

काजू क्षेत्रवाढीसाठी हवे ठोस धोरण!

Published On: Jun 08 2018 1:21AM | Last Updated: Jun 07 2018 11:14PMबेळगाव: प्रतिनिधी

जिल्ह्यात बेळगाव व खानापूर तालुक्यात अनुक्रमे 900 हेक्टर व 800 हेक्टर इतक्याच कमी क्षेत्रात शेतकरी काजू उत्पादन घेत आहेत. काजूक्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन खात्याकडून अद्यापही अपेक्षित प्रयत्न होत नाहीत. सध्या काजू रोपलागवड हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर काजू क्षेत्र वाढीसाठी ठोस धोरण राबवावे, असे मत जाणकारांतून व्यक्त होत आहे.

बेळगाव शेजारी असणार्‍या चंदगड (जि. कोल्हापूर) तालुक्यात 20 वर्षापूर्वी काजूचे क्षेत्र खूप कमी होते. मात्र शासनस्तरावर लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा यामुळे महाराष्ट्र सरकारने काजू क्षेत्र  वाढीसाठी धडक मोहीम हाती घेतली. यामुळे चंदगड तालुक्यात काजू क्षेत्रात कमालीची वाढ झाली. सद्यस्थितीत चंदगड तालुक्यात  10 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात काजू उत्पादन घेतले जात आहे. 

...तर हजारो महिलांच्या हाताला काम

जिल्ह्यात लहान-मोठे 40 उद्योग आहेत. सर्वसाधारण मोठे उद्योग 15 तर इतर लहान उद्योग आहेत. यामध्ये किमान 2 हजार महिलांना वर्षभर रोजगार मिळत आहे. काजू गर पॉलिश करणे, पार्किंग करणे या कामांना महिलांना प्राधान्य दिले जात आहे. 

हमी भावाकडे दुर्लक्ष 

काजू उत्पादक संघटित नसल्याने काजू व्यापार्‍यांचे चांगलेच फावले आहे. ज्याप्रमाणे ऊस उत्पादक संघटित झाला त्याप्रमाणे काजू उत्पादक शेतकरी संघटित झाला तर अनेक समस्या शासनाकडे मांडण्यास वाव मिळेल. सरकारवर दबाव आणून विविध सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न करता येतील. हमीभाव अभावी काजू व्यापारी उत्पादक शेतकर्‍यांची लूट करीत आहेत.  

बेळगाव- चंदगडच्या काजूला विदेशात मागणी

कोकण विभागाशी संलग्न असणार्‍या व हवामान एक सारखे असणार्‍या बेळगाव-चंदगड परिसरातील काजूचा गोडवा विदेशातही पोहोचला आहे. विविध ब्रँडच्या नावाखाली चंदगड, खानापूर, बेळगाव येथील काजू अमेरिका व युरोपात जलमार्गे निर्यात होत आहे. या उत्पादनाचे राज्य शासनाने आपल्या स्तरावर योग्य मार्केटिंग केले तर या व्यवसायाचा परिघ उंचावण्यास वेळ लागणार नाही. 

जीएसटीची सवलत हवी

जिल्ह्यात बेळगाव, खानापूर तालुक्यात काजूवर प्रक्रिया करणारे 30-40 उद्योजक आहेत. तयार काजूवर 10 टक्के जीएसटी आकारला जात आहे. ही सवलत मिळाली तर काजू विक्रीक्षेत्राला अजून वाव मिळेल. या उद्योगाला जिल्ह्यात उत्पादित होणारे काजू कमी पडत आहे. त्यामुळे शेजारील चंदगड, आजारा तालुक्यातून उद्योजक काजू खरेदी करीत आहेत. मात्र वाहतूक खर्च पाहता योग्य तो परतावा मिळत नाही. त्यामुळे स्थानिक  उत्पादन क्षेत्र वाढले तर जिल्ह्यातील काजू उद्योगाला मोठा आधार मिळेल.