Sat, Jan 19, 2019 14:17होमपेज › Belgaon › चारही स्थायी समित्यांची सत्ता मिळविणार

चारही स्थायी समित्यांची सत्ता मिळविणार

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 18 2018 9:02PMबेळगाव : प्रतिनिधी

यावर्षी मनपातील चारही स्थायी समित्यांची सत्ता मराठी गटाच्या ताब्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. गेल्या वर्षी आरोग्य स्थायी समिती वगळता तीन समित्यांची सत्ता विरोधी गटाकडे गेली. यामुळे त्या स्थायी समित्यांचे अध्यक्षपद साहजिकच मनपातील विरोधी गटाकडे गेले. पूर्ण बहुमत असूनदेखील मराठी गटातील मतभेदामुळे तीन स्थायी समित्यांची सत्ता गेल्यामुळे त्यावेळी मनपातील मराठी गटाची खूपच वाताहात झाली. यावेळी मात्र त्यासाठी सर्वच्यासर्व 32 मराठी गटाचे नगरसेवक-नगरसेविका एकत्र येणार आहेत.  25 रोजी निवडणूक होणार आहे. चारही स्थायी समित्यांची सत्ता मिळविण्यासाठी आम्ही सर्वच नगरसेवक प्रयत्नशील असल्याचे मराठी गटनेते संजय शिंदे यांनी सांगितले.

मराठी गटातर्फे चारही स्थायी समित्यांची सत्ता मिळविली तरी त्यामध्ये आजपर्यंत ज्यांनी पदे भोगलेली आहेत त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात येणार नाही तर आजतागायत सत्तेपासून वंचित राहिलेले नगरसेवक राकेश पलंगे, अनंत देशपांडे, मोहन भांदुर्गे, मीनाक्षी चिगरे, वैशाली हुलजी व ज्योती चोपडे यांनाच पदे देण्याचा निर्णय सत्ताधारी मनपा गटाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. या स्थायी समित्यांसाठी 25 जून रोजी मनपा सभागृहात निवडणूक घेतली जाणार आहे.

मनपातील कामकाजाच्या द‍ृष्टीने स्थायी समित्यांचे खूपच महत्त्व आहे. शहरातील विकासकामे व नागरिकांची महत्त्वाची कामे निकालात काढण्याच्या द‍ृष्टीने स्थायी समित्यांचे कामकाज दिशादर्शक असते. कोणतेही विकासात्मक काम असो किंवा धोरणात्मक निर्णय तो प्रथम स्थायी समित्यांमध्येच मंजूर करून मनपाच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये सभागृहाच्या मान्यतेसाठी पाठवून दिला जातो.