Fri, May 24, 2019 02:27होमपेज › Belgaon › अडीच वर्षात साडेचार कोटी दंड वसूल 

अडीच वर्षात साडेचार कोटी दंड वसूल 

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 8:00PMबेळगाव : सतीश जाधव

शहरात सुलभ वाहतूक व्हावी, यासाठी नियम तोडणार्‍या वाहनधारकांविरोधात वाहतूक विभागातर्फे कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. मागील अडीच वर्षात 4 कोटी 57 लाख 65 हजार 50 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 8 लाख 20 हजार 896 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झालेल्या 1 लाख 77 हजार 39 जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. 

शहरात एकूण 105 सीसीटीव्ही कॅमेरे असून सदरची आकडेवारी 2016 पासून मे 2018 पर्यंतची आहे. वाहतूक विभागाने शहरात नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कडक कारवाई चालविली असून विनाकागदपत्रे, विनाहेल्मेट, सिल्ट बेल्ट न लावणे आदी कारणांमुळे दंड वसुली व कारवाईची मोहीम जोरात चालविली आहे. 

वाहतूक नियम पाळणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र, शहरात नियम सर्रास मोेडले जात असून नियम तोडणार्‍यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी वाहतूक पोलिसांवर ताण येत असल्याने त्यांच्यात अस्वस्थता वाढत आहे. 

शहरातील विविध चौक व रस्त्यावर नो पार्किंग, सम-विषम, वेगमर्यादा, एकेरी वाहतूक, सिग्‍नल, झेब्रा क्रॉसिंग, प्रवासी मर्यादा, प्रदूषण नियंत्रण, नो हॉर्न झोन असे विविध नियमांचे फलक पोलिस व महापालिका प्रशासनाने लावले आहेत. मात्र वाहनधारकांकडून नेहमी नियमांचे उल्लंघन होतच असते. 

शहरात यंदेखुट, धर्मवीर संभाजी चौक, काँग्रेस रोड, राणी चन्नम्मा सर्कल, आरटओ सर्कल, टिळकवाडी पहिले रेल्वे गेट आदी ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. वाहतूक नियमांबाबत नेहमीच जनजागृती केली जाते. मात्र, वाढती वाहनसंख्या व रस्त्यावरील अतिक्रमणे यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.