Fri, Jul 19, 2019 07:32होमपेज › Belgaon › आचारसंहितेचे उल्‍लंघन करणार्‍यांवर कठोर गुन्हे

आचारसंहितेचे उल्‍लंघन करणार्‍यांवर कठोर गुन्हे

Published On: Mar 25 2018 1:46AM | Last Updated: Mar 25 2018 1:21AMबेळगाव : प्रतिनिधी

निवडणूक काळात जारी झालेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन राजकीय पक्ष व उमेदवारांकडून होणे सक्‍तीचे आहे. उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करा, अशी सक्‍त सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी एस.झियाउल्ला यांनी अधिकार्‍यांना केली.

निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेल्या विविध तुकड्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिबिराचे आयोजन येथील विश्‍वेश्‍वय्या तांत्रिक विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन करून झियाउल्ला बोलत होते.

निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपाती होण्याचे उद्दिष्ट निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍याचे असायला हवे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने पक्षपात  विसरून झोकून कामाला लागावे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली असून त्यानुसार प्रत्येकाकडून कार्य झाले पाहिजे. विविध तुकड्यांच्या प्रमुख व सदस्यांनी आपले कर्तव्य व नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

शिबिराला आदर्श आचारसंहितेचे नोडल अधिकारी रमेक कळसद, भूमापन खात्याचे संयुक्‍त संचालक जगदीश रुगी, अबकारी खाते आयुक्‍त अरूणकुमार, जिल्हा नगर कोषागार विभागाचे योजनाधिकारी डॉ.प्रवीण बागेवाडी, राज्यस्तरीय ट्रेनर एन.व्ही.शिरगावकर, प्राप्तीकर खात्याचे अधिकारी शकील अहमद आदी उपस्थित होते. 

निवडणूक काम सक्‍तीचे 

सरकारी विविध खात्यांतील अधिकारी व कर्मचार्‍यांना निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आल्यानंतर प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे. निवडणूक कामात सवलत देण्यात येणार नाही. सवलत मिळविण्यात वेळ  व्यर्थ न घालविता आपल्यावर सोपविलेली निवडणूक कामाची जबाबदारी योग्यरितीने पूर्ण करून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्याकडे लक्ष द्यावे. निवडणूक ही नैमित्तिक प्रक्रिया असून या प्रक्रियेला सकारात्मक दृष्टीने स्वीकारावे. दिवसातून 14 तास काम करीत राहिल्यास निवडणूक प्रक्रिया सुलभ होईल, असेही झियाउल्ला म्हणाले.

 

Tags : belgaon, belgaon news, Code of Conduct, violators, against, Strict crimes,