Sun, Jul 21, 2019 12:00होमपेज › Belgaon › आचारसंहिता कडक, मुद्रण व्यवसाय नरम

आचारसंहिता कडक, मुद्रण व्यवसाय नरम

Published On: May 03 2018 12:15AM | Last Updated: May 03 2018 12:10AMबेळगाव : प्रतिनिधी

सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. 12 मे रोजी मतदान होणार असून विविध मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचाराला जोर दिला आहे. यंदा निवडणूक आयोगाने कडक आचारसंहिता राबविण्याचे आदेश दिले असून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचा फटका मात्र प्रिटिंग व्यवसायाला बसला आहे. प्रचारावर अनेक निर्बंध लादण्यात आल्याने राज्यातील प्रिटिंग व्यावसायिकांचे सुमारे 500 कोटी रूपयांचे नुकसान झाले  आहे.

निवडणुका आल्या की प्रचार संबंधित व्यवसायाला तेजी येते. नेत्यांच्या प्रचारासाठी बॅनर, पक्षाचे झेंडे आदींना मागणी वाढते. मात्र निवडणूक आयोगाने प्रचारासंबंधी कडक धोरण अवलंबिले असल्याने या व्यवसायाशी संबंधित लोकांना फटका बसला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात प्लास्टिक बॅनर, झेंडे लावायला पूर्ण बंदी घातली आहे.  तसेच इतर बॅनर व झेंडे लावायलाही बंधने घालण्यात आली आहेत. 

 प्रचार साहित्याच्या परवानगीसाठीही कडक नियम करण्यात आले आहेत. त्यामुळे सहजासहजी परवानगी मिळणे मुश्किल आहे. प्रचारासंबंधी कोणताही फलक किंवा इतर साहित्या विनापरवाना वापरल्यास कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे विविध पक्षांचे उमेदवार प्रचाराबाबत कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत. आचारसंहितेनुसारच प्रचार करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार इमारतींच्या भिंतीबरोबरच झाडेही विद्रुप करण्यात येतात. यातून ऐतिहासिक इमारतीही सुटत नाही. या इमारतींचा वापरही प्रचारासाठी करण्यात येतो. तसेच प्रचारासाठी वापरले जाणारे बॅनर, झेंडे कोठेही टाकून देण्यात येतात. त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. यावेळी निवडणूक आयोगाने प्रचाराबाबत कडक आचारसंहिता अंमलात आल्याने या गैरप्रकारांना आळा बसला आहे.

 Tags : Strict Ethics, Printing Business, Belgaon