Wed, Jul 24, 2019 05:45होमपेज › Belgaon › सकल मराठा समाजाचा रविवारी रास्ता रोको

सकल मराठा समाजाचा रविवारी रास्ता रोको

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 12:45AMबेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्रात सध्या सुरू असणार्‍या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष केले असल्याच्या भावनेतून काकासाहेब शिंदे या युवकाने हौतात्म्य पत्करले. तरीही महाराष्ट्र सरकार ढिम्म असून या धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि मराठा आंदोलनाला पाठिंबा व्यक्‍त करण्यासाठी रविवारी (दि. 29) बेळगाव-चंदगड मार्गावर शिनोळी फाटा येथे सकाळी 11 वा. रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शुक्रवारी व्यापक बैठक बोलावण्याचा निर्णयही झाला.

सकल मराठा समाजाची बैठक मंगळवारी सायंकाळी जत्तीमठात झाली. समाजबांधवांच्या उपस्थितीत उपरोक्‍त निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.महाराष्ट्रातील मराठा समाजाला मिळणार्‍या आरक्षणाचा लाभ सीमाभागातील 865 खेड्यांतील मराठा समाजालादेखील मिळणार आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठा समाज बांधवांनी सक्रियपणे सहभागी होणे आवश्यक आहे, असा ठराव करण्यात आला.

महाराष्ट्रात सुरू असणार्‍या ठोक आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिनोळी फाटा येथे रास्तारोको करण्यात येईल.  बेळगाव शहर आणि परीसरातील मराठा बांधवांनी सकाळी 10 वा. धर्मवीर संभाजी चौकात जमून शिनोळीकडे कूच करायचे आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्ते परस्पर शिनोळी येथे जमा होतील. कार्यकर्त्यांनी काळी टी शर्ट परिधान करून हातात भगवे झेंडे घेऊन सहभागी व्हावे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी एकवेळचे जेवण आणि पाण्याच्या बाटलीसह सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.सकल मराठा समाजाचे निमंत्रक प्रकाश मरगाळे, प्रवक्ता गुणवंत पाटील, माजी महापौर सरिता पाटील, दत्ता उघाडे, एपीएमसी सदस्य महेश बिर्जे यांनी सूचना मांडल्या. बैठकीला प्रकाशबापू पाटील, गणेश दड्डीकर, संजय मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, प्रविण तेजम, किशोर मराठी, एम. वाय. घाडी, एम. आय. पाटील, रवी पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

‘सीमाबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे’

रास्ता रोकोबाबत व्यापक चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि. 27)  जत्तीमठात समाजबांधवांची बैठक आयोजित केली आहे. यावेळी रास्ता रोकोबाबत नियोजन करण्यात येणार असून सीमाभागातून अधिकाधिक समाजबांधव सहभागी होतील, याबद्दल चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.