Sat, Nov 17, 2018 00:10होमपेज › Belgaon › चोर सक्रीय, पोलिस सुस्त

चोर सक्रीय, पोलिस सुस्त

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 18 2018 8:25PMबेळगाव : प्रतिनिधी

सहा महिन्यांपासून चोरट्यांकडून ग्रामीण भागातील मंदिरे लक्ष्य केली जात आहेत. सहा महिन्यांत सुमारे 20 चोर्‍या झाल्या असूनही पोलिसांचे दुर्लक्षच दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भागात चोर सक्रीय आणि पोलिस सुस्त असे म्हणण्याची वेळ आली आहे. काकती, वडगाव पोलिसांनी आता ग्रामीण भागात गस्त वाढवण्याची वेळ आली आहे.

बेळगाव तालुक्यात अनेक मंदिर गाववस्तीपासून दूर आहेत. यामुळे चोरांना चोरी करणे सहज शक्य होत आहे.  बेळगाव शहरांपासून 10 ते 15 किमीच्या पट्टयात असलेल्या 15 ते 20 मंदिरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरी झाल्यानंतर पोलिसांकडून पंचनामा होतो, पण पुढे काहीच होत नाही, अशा प्रतिक्रिया ग्रामीण नागरिकांतून उमटत आहेत. तालुक्यातील गोजगा, बेनकनहळ्ळी, हिंडलगा, देसूर, झाडशहापूर, वाघवडे, गर्लगुंजी, जाफरवाडी, बेकिनकेरे, बेळगुंदी, सोनोली आदी गावांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. 

बेळगाव ग्रामीणसाठी वडगाव ग्रामीण पोलिस स्थानक कार्यरत आहे. पोलिसांनी अशा घटनांच्या तपासाला गती देणे गरजेचे आहे. यासाठी पोलिस आयुक्त किंवा पोलिस प्रमुखांनी लक्ष देण्याची मागणीही ग्रामीण भागातील नागरिकांतून होत आहे. 

टोळी एकच असल्याचा अंदाज?
ग्रामीण भागात मंदिरातील चोर्‍यांच्या घटनांत वाढ झाली आहे. गावापासून दूर असलेल्या मंदिरातच चोरीच्या घटना घडल्याचे चित्र आहे. यामुळे सदरची चोरी करण्याची टोळी एकच असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

सीसीटीव्हीची गरज
तालुक्यातील अनेक मंदिरात सीसीटीव्ही नसल्याने चोरीच्या घटना उघडकीस येणे अवघड होत आहे. यासाठी प्रत्येक मंदिरात -सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे.