Tue, Jul 16, 2019 13:46होमपेज › Belgaon › जीएसटीबाबत अजूनही गोंधळ, संभ्रम

जीएसटीबाबत अजूनही गोंधळ, संभ्रम

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jul 01 2018 12:27AMबेळगाव : प्रतिनिधी

‘एक देश एक कर’ संरचनेंतर्गत संपूर्ण देशभरात 1 जुलै 2017 रोजी जीएसटी लागू करण्यात आली. त्या प्रक्रियेला शनिवारी वर्षपूर्ती झाली असली तरीदेखील व्यापार्‍यांतून अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. जीएसटीची प्रक्रिया पूर्णपणे संगणकावर अवलंबून आहे. ही प्रक्रिया सोपी होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. पेट्रोल व डिझेलचा या प्रक्रियेत समावेश करावा, अशी मागणी उद्योजक व व्यापारी वर्गातून केली जात आहे.  

1 जुलै 2017 पूर्वी देशात अनेक कर भरले जात होते. कररचना सोपी व्हावी, यासाठी जीएसटी अंमलात आणली. याअंतर्गत 0, 5, 12, 18 आणि 28 टक्के अशा पाच टक्क्यात वस्तूवर करांची आकारणी केली जाते. वर्षभर जीएसटीसंदर्भात जागृती करण्यात आली असली तरी बहूतांश लोकांना ही प्रक्रिया समजली नाही. यामुळे उद्योगधंदा व व्यापार करताना अडचणी येत आहेत. ही प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशा प्रतिक्रिया सीए, उद्योजक, व्यापार्‍यांनी ‘पुढारी’ शी बोलताना व्यक्‍त केल्या.

जीएसटीसंदर्भात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. ही प्रक्रिया अतिशय क्‍लिष्ट आणि लोकांना न समजणारी आहे. ही संगणक प्रणाली आहे. खेड्यापाड्यांत इंटरनेट सेवा व्यवस्थित नाही. खेड्यात विदारक स्थिती आहे. खेड्यातील व्यापार्‍यांना खूप अडचणी येत आहेत. हा सरकारचा पराभव आहे. - श्रीकृष्ण केळकर,सीए

उद्योगधंद्यांना जीएसटी चांगला आहे. सुरुवातीला दोन प्रकारचे व्हॅट होते. आता एकच कर आहे. जीएसटीमुळे उद्योग क्षेत्राचा विकास होत आहे. ज्यांना ही प्रक्रिया समजली नाही त्यांना अडचणी येत आहेत. संगणक असल्यामुळे बिले करताना सोपे जात आहे. काही गोष्टींचे टॅक्स अजून कमी झाले पाहिजेत. - रोहन जुवळी,उपाध्यक्ष ः चेंबर ऑफ कॉमर्स 

जीएसटीमुळे सर्वजण एक देश एक कर या कार्यप्रणालीत आले आहेत.  पेट्रोल व डिझेलदेखील या प्रक्रियेत आणले पाहिजे. तसेच लोकांतील संभ्रम दूर करण्याची गरज आहे. जीएसटीची प्रक्रिया देखील सुरळीत केली पाहिजे. जीएसटीच्या प्रक्रियेमुळे एक कर आला. औद्योगिक वसाहत व सामान्यांनादेखील याचा लाभ झाला. - उमेश शर्मा, अध्यक्ष ः स्मॉल स्केल इंडस्ट्रीज