Sun, Oct 20, 2019 11:26होमपेज › Belgaon › बेळगावच्या प्रवेशद्वारावर ’शाहू’ पुतळा

बेळगावच्या प्रवेशद्वारावर ’शाहू’ पुतळा

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 10 2018 11:32PMबेळगाव :प्रतिनिधी

शहराच्या प्रवेशद्वारावर केएलई संस्थेच्या रुग्णालयाजवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचा एकमुखी निर्णय महापालिकेने शुक्रवारी घेतला. त्यासाठी एक कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला. त्याला सार्‍या नगरसेवकांनी बाके वाजवून अनुमोदन दिले.

कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गरिबांसाठी केलेले कायदे, बहुजन समाज शिक्षित व्हावा म्हणून सुरू केलेल्या शाळा आणि वसतिगृहे, शिक्षणाबरोबरच क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देण्यासाठी उघडलेल्या तालमी आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केलेले उद्योग लक्षात घेऊन त्यांच्या योगदानाचे स्मरण राहण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बेळगाव शहरात असावा, असा ठराव याआधीच महापालिकेत झाला होता. शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब होताना निधीही मंजूर करण्यात आला. 

कोल्हापूरहून बेळगावात प्रवेश करताना केएलई रुग्णालयाच्या पुढे महामार्गाजवळच्या चौकात हा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला. पुतळा उभारण्याआधी शाहू महाराजांचे इतर राज्यांमधील पुतळे पाहण्याचाही निर्णय झाला. 

‘पुतळा बसविताना स्वतंत्र कमिटी करा, सर्व व्यवहार पारदर्शक करा’, असा सल्ला नगरसेवक दीपक जमखंडी यांनी दिला. तर ‘यापूर्वी महापालिकेसमोर बसविण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासबंधी अनुभव गाठीला आहे’, असा चिमटा महापौरांना काढला. शुक्रवारी आयोजित महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आरोप-प्रत्यारोपांनी गाजली. सकाळपासून केवळ चर्चा झाली. दुपारनंतर महत्त्वाचे निर्णय झाले.

बैठकीच्या सुरुवातीला नगरसेवक दिनेश नाशीपुडी यांनी एंटरप्राईज फंडबद्दल उलटसुलट प्रश्‍न विचारून अधिकार्‍यांना धारेवर धरले. निविदा न काढता वर्षभर राष्ट्रीय सण व उत्सवासाठी मंडप सजावटीचे काम कसे     मंजूर करण्यात आले, असा प्रश्‍न किरण सायनाक यांनी उपस्थित केला. 58 प्रभागासाठी सर्व्हिस वायर बदलण्यासाठी 1 कोटी 11 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता त्याचे पुढे काय झाले? असेही त्यांनी विचारले. तर रतन मासेकर यांनी ब्युटी पार्लरसाठी निधी दिला जातो, मात्र पुढे त्या महिला व्यवसाय करतात का याकडे लक्ष द्यायला हवे, अशी सूचना केली. ज्या महिलांना महापालिकेने मदत केली आहे, त्या ठिकाणचे पार्लर गायब आहेत, अशी तक्रार त्यांनी मांडली.

आरोपांना उत्तर देताना आयुक्त शशीधर कुरेर म्हणाले, आपल्याच प्रभागात कामे झाली नाहीत असा आरोप करणे चुकीचे ठरेल. तातडीची गरज असलेल्या ठिकाणी निधी खर्च केला आहे. राष्ट्रीय सण व उत्सवासाठी निविदा न मागविता व्हाऊचरवर बिले भागवून मंडप सजावटीचे कामे करून घेतली आहेत. कारण निविदा मागविणे, त्या उघडणे व त्यावर शिक्कामोर्बत करणे ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्या त्या वेळेत राष्ट्रीय सण उत्सव करावे लागतात. 

नगरसेविकांचे ठिय्या आंदोलन

आपल्या प्रभागातील नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी महापालिका निधी देत नाही. सतत तीन वेळा नगरसेविका म्हणून महापालिकेत हजेरी लावली आहे. नगरसेविकांनी केलेल्या मागणीला कचर्‍याची टोपली दाखविली जाते, अशी तक्रार करत  15 मिनिटे सभागृहासमोर नगरसेविका शांता उप्पार व सरला हेरेकर यांनी ठिय्या आंदोलन छेडले. सोमवारी प्रत्यक्ष भेट देण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.  बैठकीला महापौर बसाप्पा चिकदिन्नी, उपमहापौर मधुश्री पुजारी, आयुक्त शशीधर कुरेरसह महापालिकेतील सर्व खात्याचे अधिकारीवर्ग व 58 प्रभागातील नगरसेवक व नगसेविका उपस्थित होत्या.

इतिहासही लिहा...

‘शाहू महाराजांचे कार्य मोठे आहे. पुतळ्यालगत त्यांचा इतिहासदेखील लिहावा’, अशी सूचना नगरसेविका वैशाली हुलजी, संज्योत बांदेकर व रतन मासेकर यांनी केला.