Tue, Jul 23, 2019 11:35होमपेज › Belgaon › राजर्षिंच्या पुतळ्यातून मिळणार विचारांना उजाळा

राजर्षिंच्या पुतळ्यातून मिळणार विचारांना उजाळा

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMबेळगाव : प्रतिनिधी

बहुजन समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये देशात पहिल्यांदा आरक्षण ठेवणारा क्रांतिकारी राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या राजर्षि शाहू महाराजांचा पुतळा बेळगावात बसविण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. याचे स्वागत पुरोगामी संघटना आणि विचारवंताकडून करण्यात येत आहे. पुतळा उभारणीतून त्यांच्या कार्याला आणि विचारांना उजाळा मिळणार आहे. 

राजर्षि शाहू महाराज देशभरात पुरोगामी राजे म्हणून ओळखले जातात. परंपरेच्या बेड्या तोडून अनेक विधायक उपक्रम त्यांनी करवीर संस्थानात  (सध्याचे कोल्हापूर)राबविले. देशभरातील सामाजिक चळवळींना कृतीशील कार्याने पाठिंबा दिला. अशा आदर्श राजाचा पुतळा उभारण्याची मागणी शहरातील अनेक संघटनांनी  केली होती. त्यामुळे बेळगाव शहराच्या प्रवेशद्वारावर भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे.

बेळगाव शहराशी राजर्षिंचे निकटचे संबंध होते. जिल्ह्यातील रायबागपर्यंत राजर्षिंची जहागिरी होती. त्यांनी अनेक संस्थांना आर्थिक मदत दिली होती. त्यातून पुरोगामी विचार अद्यापही जोपासले जातात. धारवाड येथे झालेल्या  1927 मध्ये झालेल्या पहिल्या ब्राम्हणेत्तर संघटनांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी भूषविल होते. 

पुतळा केएलई इस्पितळाजवळ शहराच्या प्रवेशद्वारावर बसविण्याचे नियोजन आहे. यामुळे शहरात येणार्‍या प्रत्येक नागरिकाला याचे दर्शन होणार आहे. पुतळ्यासभोवती आकर्षक उद्यान उभारण्यात येईल. त्याचबरोबर त्यांच्या विचाराची ओळख करून देणारे मराठी, कन्नड, इंग्रजी भाषेतील फलक लावण्याची मागणी करण्यात येत आहे. यातून त्यांचा विचार समजून घेणे नव्या पिढीला शक्य होईल. या पद्धतीने मनपाने नियोजन करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

गरज व्याख्यानमालेच

राजर्षि शाहूंच्या विचाराचा जागर होण्यासाठी मनपाने मराठी, कन्नड भाषेतून व्याखानमाला आयोजित करण्याची गरज आहे. त्यामुळे राजे शाहूंचे कार्य बेळगावातील लोकांनाही कळू शकेल.

दलित संघटनांनी केलेल्या मागणीनुसार ठराव झालेला आहे. शहराच्या प्रवेशद्वारात त्याची उभारणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर महात्मा फुले, जगतज्योती बसवेश्‍वर महाराज यांचा पुतळा बसवण्याची मागणी करण्यात येणार आहे.  मनपाने मराठी व कन्नड भाषेतून  व्याख्यानमाला सुरू करण्याची आवश्यकता आहे. - प्रा. के. डी. मंत्रेशी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

मनपाने केलेल्या ठरावाचे स्वागत करतो. पुतळा उभारणीच्या मागणीसाठी दलित संघटनांतर्फे सातत्याने आवाज उठविण्यात आला. याची दखल घेऊन मनपाने ठराव केला आहे. त्याची अमलबजावणी त्वरित करावी. यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. - मोहन कांबळे, दलित संघटना कार्यकर्ता

शाहू महाराज आणि बेळगाव यांचे निकटचे संबंध होते. त्याचबरोबर हुबळी, धारवाड येथेही त्यांनी ऐतिहासीक कार्य केले आहे. त्यामुळे यापूर्वीच हा पुतळा होणे आवश्यक होता. सध्या झालेल्या ठरावाची अंमलबजावणी त्वरित करावी. त्याचबरोबर त्यांच्या नावे वाचनालय सुरू करावे.  - अ‍ॅड. राजाभाऊ पाटील,  पुरोगामी विचारवंत