Sat, Jun 06, 2020 23:22होमपेज › Belgaon › राज्य विधिमंडळ अधिवेशन आजपासून; पण कॅमेर्‍याआड 

राज्य विधिमंडळ अधिवेशन आजपासून; पण कॅमेर्‍याआड 

Last Updated: Oct 10 2019 12:16AM
बंगळूर : प्रतिनिधी

राज्य शासनाने विधिमंडळ अधिवेशनावेळी प्रसारमाध्यमांवर निर्बंध घातले आहेत. या निर्णयानुसार प्रसारमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करता येणार नाही. पण, सभागृहातील वृत्तांकनासाठी प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येणार आहे. गुरुवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत असून नवा नियम लागू करण्यात येत आहे.

याआधीच्या अधिवेशनावेळी प्रेक्षा गॅलरीत इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या कॅमेरामनना प्रवेश देण्यात येत होता. याचे थेट प्रक्षेपण वृत्त वाहिनीवरून केले जात होते. पण, यापुढे कॅमेरामनना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. विधानसभा सभापती आणि विधान परिषद अध्यक्षांकडून आवश्यक चित्रफिती प्रसारमाध्यमांना पुरवल्या जाणार आहेत. सध्या राज्यसभा आणि लोकसभेमध्ये अशा पद्धतीने कामकाज चालते. त्याच धर्तीवर कर्नाटक विधिमंडळाचे कामकाज चालणार आहे.

प्रसारमाध्यमांवर नियंत्रासाठी याआधीही प्रयत्न करण्यात आले होते. पण, तत्कालीन विरोधी पक्षाने आणि प्रसारमाध्यमांनी विरोध केल्याने निर्णय स्थगित करण्यात आला होता. विद्यमान सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी प्रसारमाध्यमांवर निर्बंधाचा निर्णय घेतला आहे. थेट प्रक्षेपण होत असल्याने आमदारांना सभागृहात कामकाज करताना अडचणींना तोंड द्यावे लागते, असे त्यांचे म्हणणे आहे.

भाजप कोंडीत अडकणार?

दरम्यान, काँग्रेस-निजद आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपची सत्ता आली. पण, सत्तेवर आल्यापासून भाजपला अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. बेळगावसह उत्तर कर्नाटकात अनेक गावे पाण्याखाली गेली. यासाठी केंद्राकडून 1200 कोटींचा निधी विलंबाने उपलब्ध झाला. राज्य शासनाने 10 हजार रु. तातडीची मदत केली आहे. त्यामध्येही अनेक ठिकाणी गोंधळ उडाला आहे. अनेक पूरग्रस्त शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा स्थितीत विधिमंडळ अधिवेशनावेळी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी काँग्रेस आणि निजद नेते सज्ज आहेत. तर सत्तारुढ भाजपनेही विरोधकांना तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी केली आहे. पहिल्याच दिवशी प्रसारमाध्यमांवर निर्बंध आणि पूरग्रस्तांचा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत.