होमपेज › Belgaon › सरकारी कर्मचार्‍यांची खुशीपंचमी

सरकारी कर्मचार्‍यांची खुशीपंचमी

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 11:35PMबेळगाव : प्रतिनिधी       

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना 30 टक्के वेतनवाढ जाहीर झाली आहे. होळीदिवशीच राज्य सरकारने वेतनवाढीचा निर्णय जाहीर करून सणाच्या आनंदात भर घातली आहे. ही वेतनवाढ 1 जुलै 2017 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार असून, फरक वेतन लवकरच देण्यात येईल. तर येत्या एप्रिलपासून वाढीव वेतन नियमित मिळेल. मुख्य वेतनश्रेणी व 25 स्थायी वेतनश्रेणी लागू होणार आहेत. वेतनवाढीचा लाभ 5 लाख 93 हजार कर्मचारी व 5 लाख 73 हजार पेन्शनधारकांना होणार आहे.

प्राथमिक, माध्यमिक आणि पदवपूर्व महाविद्यालीन शिक्षक? प्राध्यापकांच्या वेतन व भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी, विद्यापीठातील अध्यापकेतर कर्मचार्‍यांनाही याचा लाभ मिळणार आहे. किमान वेतन 17 हजार आणि कमाल वेतन 1 लाख, 50 हजार, 600 रु.पर्यंत निश्‍चित करण्यात आले आहे. पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे. किमान पेन्शन 4 हजार 800 रु.वरून 8, 500 रु.पर्यंत आणि कमाल पेन्शन 39 हजार 900 रु.वरून 75 हजार 300 रु.पर्यंत वाढविण्यात आले आहे. तर कुटुंब निवृत्ती वेतन किमान 4,800 रु.वरून 8,500 तर कमाल 23, 940 वरून 45, 180 रु.पर्यंत वाढविण्यात आले आहे.

1 जुलै 2017 पासून 31 मार्च 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेले किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या राज्य सरकारी कर्मचार्‍यांनाही वेतनवाढ व भत्तावाढीचा लाभ मिळणार आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) निवृत्त अधिकारी एम.आर. श्रीनिवासमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली जून 2017 मध्ये सहावा वेतन आयोग स्थापन करण्यात  आला होता. आयोगाने गेल्या 31 जानेवारी रोजी राज्य सरकारला अंतिम अहवाल सादर केला होता.

अशी वेतनवाढ

किमान वेतन ः 17 हजार
कमाल वेतन ः 1,50,600
किमान पेन्शन ः 8,500
कमाल पेन्शन ः 75,300