Thu, Jul 18, 2019 02:15होमपेज › Belgaon › व्होटिंगनंतर आता बेटिंग सुरू

व्होटिंगनंतर आता बेटिंग सुरू

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 14 2018 12:02AMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभेसाठी शनिवारी शांततेन मतदान झाले असून आता उमेदवारांच्या विजयाची आणि कोणते सरकार सत्तेवर येणार याची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी संपूर्ण राज्यात सट्टा लावला जात असून एक्झिट पोलच्या अंदाजाचा आधार, आकडेवारीचा आधार यासाठी घेतला जात आहे.

मतदान संपल्यानंतर सायंकाळी 6 पासून विविध वृत्तवाहिन्यांनी ‘एक्झिट पोल’चे विशेष वृत्त सादर केले. यामध्ये विविध संस्थांनी, प्रसारमाध्यमांनी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मांडण्यात आला. यामध्ये बहुतेक संस्थांनी भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असून काँग्रेस दुसर्‍या आणि निजद तिसर्‍या स्थानावर असल्याचे सांगितले आहे. या आधारावर राजकीय नेते, कार्यकर्ते चर्चा करत आहेत. अनेकांनी बेकायदा असणार्‍या सट्टाबाजारातील बुकींशी संपर्क साधला आहे. सध्या गल्‍लीच्या कोपर्‍यावर, चहाची टपरी, हॉटेल, बार, दुकाने अशा विविध ठिकाणी कोण सत्तेवर येणार याची चर्चा करत आहेत.

मतदानानंतर दुसर्‍या दिवशी बहुतेक उमेदवारांनी घरी राहणे पसंत केले आहे. आणखी दोन दिवसांनी मतमोजणी होणार असल्याने ते सध्या रिलॅक्स मूडमध्ये आहेत. काही उमेदवार कार्यकर्त्यांशी गप्पाटप्पा करत असून उमेदवारांच्या विजयाबाबतचा हिशेब घालत आहेत. प्रचाराच्या ताणातून मुक्‍त झालेल्या काहींजणांनी राज्यात रहायचे नको म्हणून परराज्यातील पर्यटनस्थळी, परदेशातील पर्यटन स्थळांकडे रवाना झाले आहेत.

गेल्या महिनाभरापासून उमेदवारांकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, प्रचार, कार्यकर्त्यांची संघटना अशी अनेक कामे हाती घेण्यात आली. अखेर मतदान झाल्याने उमेदवार रिलॅक्स असले तरी त्यांना निकालाची हुरहूर लागली आहे. राजकारणात प्रस्थापित असणार्‍या काही उमेदवारांसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असून काहीजणांचे राजकीय भवितव्य निकालावर अवलंबून आहे.

निवडणुकीच्या आधीपासूनच यावेळी त्रिशंकू सरकार येणार आणि निजद किंगमेकर बनणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे केवळ राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून जोरदार सट्टेबाजी सुरू आहे.