Sun, Mar 24, 2019 04:41होमपेज › Belgaon › आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला प्रारंभ

आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला प्रारंभ

Published On: Jan 21 2018 2:44AM | Last Updated: Jan 20 2018 11:30PMबेळगाव : प्रतिनिधी

माजी आ. अभय पाटील यांच्यातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. या महोत्सवामध्ये विदेशातील 25 तर देशातील वीस पतंगपटू सहभागी झाले आहेत. सुरतमधील युवकांनी सादर केलेला ड्रॅगन स्वरूपातील पतंग आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. 

यावर्षीचा हा आठवा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अंगडी इन्स्टिट्यूट महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. चार दिवस चालणार्‍या या महोत्सवात चिल्ड्रन फेस्टिव्हल, युथ फेस्टिव्हल, सोलो डान्स, बाऊन महोत्सव, ढोल ताशा, सोलो फॅशन शो, हिपहॉप डान्स, क्रैकर शो आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

उद्योजक दिलीप चिटणीस, मारूती कोणो, माजी आ. अभय पाटील, टी. एन. काटवा, विनायक कडोलकर, भरत देशपांडे आदींच्या उपस्थितीत पतंग महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.  चैतन्य कुलकर्णी यानी उपस्थितांचा परिचय करून दिला. अभय पाटील यांनी स्वागत केले. याप्रसंगी देश-विदेशातील पतंगपटू व मान्यवर उपस्थित होते. 

ऑस्ट्रेलिया येथील दाम्पत्याने सलग दुसर्‍या वर्षी भाग घेऊन इजिप्शियन देवतेची प्रतिमा असलेला पतंग सादर केला. स्वित्झर्लंड येथील आड्रोयन, मॅन्युएल, जेनिन व मार्शेल ब्सुरी हे कुुटुंब पहिल्यांदाच या महोत्सवात सहभागी झाले आहे. याचप्रमाणे इस्तोनिया येथील टार्मी ख्रिस्तोवेक, मारिका रोकका, इरटोरिका हेही पहिल्यांदाच पतंग महोत्सवात सहभागी झाले आहेत. व्ही. के. राव यांनी कुलभूषण जाधव यांची प्रतिमा असलेला व त्यांच्या सुटकेबाबतचा संदेश असलेला पतंग लक्षवेधी ठरला. 

ड्रॅगन पतंगाचे आकर्षण

सुरत येथील नितेश लकुम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ड्रॅगनचा पतंग सादर केला आहे. एकूण 110 पट्टे असलेल्या या पतंगाचे जमिनीवरील वजन पंधरा किलो तर हवेत गेल्यानंतर 750 किलो इतके होते. तो सर्वांचे आकर्षण ठरला आहे.