Thu, Apr 25, 2019 05:55होमपेज › Belgaon › स्थायी समितीचा कारभार चेंबरविना

स्थायी समितीचा कारभार चेंबरविना

Published On: Jul 26 2018 1:31AM | Last Updated: Jul 25 2018 11:42PMबेळगाव : प्रतिनिधी

जि. पं. कार्यालयामध्ये स्थायी समिती अध्यक्षांना कायमस्वरुपी चेंबरची सोय नसल्याने कसरत करावी लागत आहे. नवनियुक्त अध्यक्षांनाही याचा सामना करावा लागणार असून ते कोणती भूमिका घेतात याकडे नजरा लागून राहिल्या आहेत. जिल्ह्याचा कारभार हाकण्यासाठी स्थायी समिती अध्यक्षांना कायमस्वरुपी कार्यालयाची आवश्यकता आहे.

बेळगाव जिल्हा विस्ताराने सर्वाधिक मोठा असून राज्यात सदस्यांचीही संख्या मोठी आहे. सभागृहात दहा तालुक्यातील 90 सदस्य कार्यरत आहेत. त्यांचे कामकाज करण्यासाठी कार्यरत असणार्‍या स्थायी समिती अध्यक्षांना कामकाज पाहण्यासाठी मात्र कार्यालयाची वानवा आहे. यामुळे कारभार कसा हाकावा असा प्रश्‍न नूतन अध्यक्षांना भेडसावत आहे.

जि. पं. मध्ये पाच स्थायी समिती कार्यरत आहेत. त्यापैकी दोन स्थायी समितींची जबाबदारी अध्यक्ष व उपाध्यक्षाकडे आहे. उर्वरित तीन अध्यक्षांना कार्यालयाची आवश्यकता आहे. प्रशासनाने मात्र याकडे कानाडोळा केला असून याचा फटका अध्यक्षांना सहन करावा लागत आहे.

यापूर्वीदेखील कार्यरत असणार्‍या अध्यक्षांना याप्रकारचा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे काही अध्यक्षांनी वैयक्तिक कार्यालये सुरू करून नागरिकांची सोय करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, यासाठी अध्यक्षांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

जि. पं. चा कारभार सुरळीत चालवण्यात स्थायी समितीची महत्त्वाची भूमिका असते. वेगवेगळ्या समितीमध्ये होणार्‍या कामकाजावर जि. पं. ची रुपरेषा ठरत असते. त्याचबरोबर स्थायी समिती अध्यक्षाकडे असणार्‍या अधिकारामुळे जिल्हाभरातील नागरीक तक्रारी घेऊन येत असतात. त्यांच्या सोयीसाठी कार्यालयाची गरज असते. मात्र पाच पैकी तीन अध्यक्षांना आपला कारभार जि. पं. अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष यांच्या कार्यालयातून हाकण्याची कसरत करावी लागते.

बेळगाव जि. पं. ची इमारत प्रशस्त आहे. याठिकाणी वेगवेगळी कार्यालये कार्यरत आहेत. अधिकार्‍यासाठी स्वतंत्र चेंबर आहेत. मात्र, स्थायी समिती अध्यक्षासाठी जागा नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.