Wed, May 22, 2019 06:50होमपेज › Belgaon › करवाढ नसलेले अंदाजपत्रक मांडणार

करवाढ नसलेले अंदाजपत्रक मांडणार

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 12:01AMनिपाणी : प्रतिनिधी

सर्वसामान्यांना गृहित धरून सर्व सूचनांचा आदर करून निपाणी नगरपालिकेचे कोणतेही करवाढ नसलेले अंदाजपत्रक सादर केले जाईल. निपाणी शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही स्थायी समिती सभापती नितीन साळुंखे यांनी स्थायीच्या बैठकीत दिली.

शुक्रवारी सकाळी पालिका सभागृहात ही बजेटपूर्व बैठक झाली. यावेळी मुख्य अकाऊंटंट नागेंद्र बहाद्दुरी यांनी मागील वर्षाच्या अंदाजपत्रकातील तरतुदींचे वाचन केले. यावर्षी 4 कोटी रूपये एसएफसीतून तर 1.94 कोटी 14 व्या वित्त आयोगाकडून अनुदान मिळेल, असे सांगितले. शरद सावंत यांनी बजेटपूर्व बैठकीत नागरिकांकडून आलेल्या सूचना वाचून दाखविल्या. संजय सांगावकर यांनी पालिकेचे 28 कोटींचे अंदाजपत्रक असते. यावेळी पाणीपट्टी यामध्ये धरता येणार नसल्याचे स्पष्ट केले. आता एडीबी प्रकल्पातून पूर्णत्वास येत असलेल्या 24 तास पाणी योजनेकडे पाणीपट्टी वर्ग होणार आहे. वार्षिक 8 कोटी रुपये पगार व वीजबिलावर खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले. निपाणीत पत्रकार भवन बांधण्यासाठी 50 लाखांची तरतूद करावी, अशी सूचनाही मांडली.

उज्ज्वला पोळ व नीता लाटकर  यांनी वॉर्ड क्रं. 8  व 31 मध्ये गटारी व सीडीवर्क करण्याची मागणी केली. अनिस मुल्ला यांनी वैयक्तिक शौचालयासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान कमी मिळते. त्यामुळे 20 लाख रु.  तसेच कब्रस्तान व ईदगाह माळासाठी तरतूद  करण्याची मागणी केली. धनाजी निर्मळे यांनी गेल्या 4 वर्षांत स्थायी समितीकडून कमी खर्चाची कामे झाली नाहीत. मागील बजेटमधील बर्‍याच तरतुदी राहून गेल्या आहेत. सफाई कामगारांना खोरे, बुट्ट्या, झाडू आदी साहित्य नसल्याने शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले. रवींद्र शिंदे यांनी हवेली तलावात गणपतींचे विसर्जन होत असल्याने तेथे घाट बांधून सुशोभीकरणासाठी तरतूद करण्याची मागणी केली.

कंत्राटी कामगारांचा पगार वेळेवर होत नसल्याबद्दलची चर्चा झाली. स्वागत आयुक्त दीपक हरदी यांनी केले. चर्चेत अभियंता पी. जे.शेंडूरे, विवेक जोशी व विनायक जाधव यांनी सहभाग घेतला.