Fri, Apr 19, 2019 11:56होमपेज › Belgaon › पेरणीपूर्व मशागतीला वेग...

पेरणीपूर्व मशागतीला वेग...

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 10:09PMबेळगाव : प्रतिनिधी

मृग नक्षत्र अवघ्या 15 दिवसांवर येवून ठेपले आहे. यामुळे बळीराजाची धांदल उडाली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगाने करण्यात येत असून शिवारातील वर्दळ वाढली आहे. कामाची लगबग वाढल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात धूळवाफ पेरणी करण्यात येते. त्यापूर्वी शेतातील मशागतीची कामे जोमाने सुरू आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात पेरणी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येते. त्याचबरोबर पश्चिम भागातही पेरणी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात करण्यात येते. अलिकडच्या काळात पेरणी टाळून रोपलागवडीचे प्रमाण वाढले आहे.

मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत पाच दिवस पाऊस झाला. यामुळे शिवारात नांगरणी, कुळवणीसाठी आवश्यक ओलावा तयार झाला आहे. मशागतीला पूरक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे नांगरटीच्या कामाने गती घेतली आहे. नांगरट करण्यासाठी बैलजोडींची कमतरता जाणवत आहे. यामुळे ट्रॅक्टरना मागणी वाढली आहे. ट्रक्टरच्या सहाय्याने नांगरट करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. कुळवणीची कामेही जोमाने सुरू आहेत. 

एकाचवेळी मशागतीच्या कामांना गती आल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. शेतीकामासाठी मजूर मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. सध्या लग्नसमारंभाचीदेखील धांदल सुरू आहे. त्यातच पेरणी कामाची झुंबड उडणार आहे. धूळवाफ पेरणी मृग नक्षत्राच्या आधी आटोपण्यात येते. भात पेरणीसाठी संकरीत बियाणांना अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे कृषी सेवा केंद्रांच्या समोर गर्दी आहे. ही ठिकाणी शेतकर्‍यांची फसवणूक करण्याचा धंदा देखील दुकानदाराकडून करण्यात येत आहे. स्थानिक शेतकर्‍याकडून भात विकत घेवून ते शेतकर्‍यांना अधिक भावाने विकण्यात येत आहे.

कृषी खात्याकडून निराशा

कृषी खात्याकडून शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात बियाणांचा पुरवठा केला जातो. मात्र शेतकर्‍यांना हवी असलेली बियाणे कृषी कार्यालयात उपलब्ध नसतात. हीच बियाणे दुकानातून भरमसाठ दराने शेतकर्‍यांना विकत घ्यावी लागतात. यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक लूट होते. कृषी खात्याबाबत शेतकर्‍यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.