Wed, Jan 23, 2019 19:54होमपेज › Belgaon › व्यापारी लूटप्रकरणी विशेष पथक

व्यापारी लूटप्रकरणी विशेष पथक

Published On: Dec 08 2017 1:36AM | Last Updated: Dec 07 2017 10:55PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

वसुलीसाठी बेळगावला आलेले तुमकूरचे फूल व्यापारी नारायण मुद्दाप्पा (वय 48) यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून त्यांच्याकडील 24 लाख 22 हजार रुपये लुटण्यात आले होते. या प्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर यांनी आझादनगर परिसराला भेट देऊन लूटप्रकरणाची माहिती घेतली आहे. याचबरोबर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष पथक नियुक्‍त करण्यात आले आहे. 

वसुलीसाठी नारायण रविवारी बेळगावला आले होते. वसुलीनंतर सोमवारी मध्यरात्री तुमकूरला जाण्यासाठी ते आझादनगर येथील सागर हॉटेलजवळ बसच्या प्रतीक्षेत  थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानी त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून आणि शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील रक्‍कम घेऊन पोबारा केला होता.

परगावच्या व्यापार्‍याची बेळगाव शहरात मोठ्या रकमेची लूट करण्यात आल्यामुळे सदर प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनीही याचे गांभीर्य ओळखून चोरट्यांचा छडा लावण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर, शंकर मारिहाळ यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेेतली. 

आझादनगर परिसरातील संपर्क मार्गावरील काही ठिकाणच्या सीसीटीव्ही चित्रणाची पाहणी करण्यात आली. नारायण यांना ओळखणार्‍यांंपैकीच एकाने ही लूट केली असावी, असा संशय आहे. नारायण यांचा बेळगावात कोणा कोणाशी व्यापारी संपर्क आहे,  त्याचीही माहिती घेण्यात आली. लूटप्रकरणी विशेष पथक नियुक्‍त केले आहे.  उपायुक्‍त  लाटकर, मारिहाळ व माळमारुती ठाण्याचे निरीक्षक चन्नकेशव टिंगरेकर यांच्यामध्ये चर्चा झाली. टिंगरेकर तपास करीत आहेत.