Wed, Jun 26, 2019 11:35होमपेज › Belgaon › चांगल्या हवामानामुळे शाळूला आला बहर 

चांगल्या हवामानामुळे शाळूला आला बहर 

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 19 2018 9:11PMनिपाणी : प्रतिनिधी

गतवर्षी सुरवातीला पावसाने चांगली साथ दिल्याने यंदा कधी नव्हे ते खरीप हंगाम साधला आहे. या हंगामातून शेतकरीवर्गाला अपेक्षित  उत्पन्न मिळाल्यामुळे तो सुखावला आहे. खरिपानंतर रब्बीत चांगले हवामान लाभल्याने शिवारात तब्बल 1,200 एकरवरील शाळू पिकाला मोत्याचा तुरा फुटला असून तो काढणीला आला आहे. 

चांगल्या हवामानामुळे या पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळणार असल्याने यंदा भाकरी साधणार हे निश्‍चित झाले आहे. कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार यंदा रब्बी हंगामात खरिपात घेतल्या गेलेल्या सोयाबीन पीक उत्पादनापाठोपाठ जादातर क्षेत्रावर शाळूचे उत्पादन घेतले आहे.  पिकाला खरिपासह हंगामी पावसाने दिलेल्या चांगल्या साथीचा लाभ मिळाला. यामुळे हे पीक काढणीला आले आहे. आठ दिवसात या पिकाच्या काढणीला सुरूवात होणार आहे.

सध्या शिवारात कमी क्षेत्रावर असलेल्या ऊस तोडणीची कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. ऊस पिकानंतर शेतकर्‍यांनी बारमाही दोन्ही नद्यांचा  व शिवारातील विहिरीतील पाण्याचा आधार घेत हे पीक जगविले आहे. अपेक्षेपेक्षाही पिकाला चांगला फुटवा आल्याने पीक चक्क मोत्यासारखे आले आहे. तसेच चाराही मिळणार आहे. निपाणी भागात खरिपात भुईमूग, सोयाबीन, तंबाखू, ऊस तर रब्बीत कांदा, हरभरा, गहु, शाळू आदी कडधान्य व भाजीपाल्याचे अमाप उत्पादन घेतले जाते. दोन वर्षापासून शेतकरीवर्गाला उसापाठोपाठ तंबाखू पिकाचेही चांगले उत्पन्न मिळाले आहे. यंदा ऊस पिकातून अपेक्षेपेक्षाही चांगला दर मिळाला आहे. गतवर्षी तंबाखूला चांगला दर मिळाला असला तरी त्याने तीन अंकी आकडा पार केला नाही. यंदा अधिक दर मिळेल, अशी अपेक्षा आहे.

या वर्षीपासून तंबाखूवर केंद्र सरकारने जीएसटी लावल्याने याची  सल उत्पादकाला लागून आहे. उत्पादकाची कोंडी झाली आहे. शिवारात आडसाली ऊसलावणीसह उशिरा घेतेलेल्या पिकाच्या आंतमरमशागती कामाला सुरवात केली. आठ दिवसात शाळू पिकाची कापणी होणार आहे. शाळू, गहु, हरभरा पिकाचीही वाढ चांगली झाली असून आगाऊ टप्प्यातील गहूही काढणीला आला आहे.