Fri, Apr 19, 2019 12:47होमपेज › Belgaon › ‘त्या’ अनुभवाने आयुष्याला कलाटणी : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 

‘त्या’ अनुभवाने आयुष्याला कलाटणी : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 18 2018 10:41PMबेळगाव : प्रतिनिधी

अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमधून काम केले. मात्र, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटातील अनुभवाने आपले आयुष्यच बदलले, असे प्रांजळ मत सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ‘दै. पुढारी’कडे व्यक्त केले.

नियती फाऊंडेशन आयोजित ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमानिमित्त  सोनाली बेळगावाला आल्या होत्या. यावेळी त्यांच्याशी मनमोकळी चर्चा झाली. सोनाली यांनी चित्रपट, अभिनय आणि सामाजिक जीवनाविषयी दिलखुलास मते व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात काम करताना विलक्षण अनुभव आले. चंद्रपूरच्या दुर्गम भागातील आदिवासींसाठी आमटे परिवाराने केलेल्या प्रचंड कामाची जाणीव झाली. दुर्गम भागातील जनतेला होणार्‍या त्रासाची जाणीव होऊन आमटे परिवाराने उपेक्षित आणि वंचितांसाठी केलेले कार्य अलौकिक आहे, याची प्रचिती आली, आमटे परिवाराच्या जगण्याची संकल्पना कळली. प्रत्येकाला आयुष्यात धनदौलत, गाडीबंगला, कपडालत्ता, पुरस्कार हवे असते. मात्र, त्या चित्रपटातील अनुभवातून माझे आयुष्य आयुष्य बदलले. आमटे परिवाराच्या सामाजिक कार्याची सर्वांना ओळख आहे. मात्र, बाबांच्या साहित्याची ओळख घडवून देण्याचे काम हाती घेतले आहे. बाबांच्या कविता आणि पत्रे साहित्यरूपात मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाबांच्या आयुष्यावर आधारित ‘करुणोपनिषदे’ हा कार्यक्रम करत आहे. 

सिनेसृष्टीत वेगवेगळ्या पिढ्यांबरोबर काम करता आले. रिळाचा चित्रपट डिजीटलही झाला. अमीर खानपासून नाना पाटेकर यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. या दोघांकडे स्वत:ची स्वतंत्र अभिनयशैली आहे. त्यांच्याकडून अभिनय आणि सामाजिक कार्याची ओळख झाली. नानाने ‘नाम’द्वारे तर आमीरने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून हाती घेतलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. लवकरच आपण नसिरुद्दीन शहा यांच्यासोबतही काम करणार आहे.

नव्या दमाच्या तरुण दिग्दर्शकांची संख्या वाढली आहे. नवे दिग्दर्शक समर्थपणे कार्यरत आहेत. गोड पदार्थावर निर्माण झालेल्या ‘गुलाबजामून’ चित्रपटाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला आहे. आपल्या चित्रपटांना ऑक्सरची गवसणी घालता आली नाही, याची खंत नाही. ऑक्सरप्रमाणे इतरही मानाचे आणि प्रतिष्ठेचे पुरस्कार मला मिळाले आहेत. मराठी चित्रपटांना मिळणारे यश आशादायी आहे. कलाकारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सहजपणे प्रसिद्धी मिळू लागली आहे, असेही त्यांनी सांगितले.निर्माते तनˆमनˆधन अर्पून चित्रपट बनवितात. त्यांच्या प्रयत्नांचा अवमान होऊ नये, याची काळजी बोर्डाने घ्यावीअसेही त्यांनी स्पष्ट केले.