Sat, Sep 22, 2018 08:48



होमपेज › Belgaon › हलग्याचा जवान शहीद

हलग्याचा जवान शहीद

Published On: Jul 11 2018 1:35AM | Last Updated: Jul 10 2018 11:55PM



खानापूर : प्रतिनिधी

बस्तर (छत्तीसगड) विभागातील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात सीमासुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद झाले. दोघेही कर्नाटकातील असून त्यामध्ये हलगा (ता. खानापूर) येथील संतोष लक्ष्मण गुरव (वय 26) या जवानाचाही समावेश आहे. विजयानंद नायक असे वीरमरण आलेल्या दुसर्‍या जवानाचे नाव आहे.

सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कांकेर जिल्ह्याच्या नक्षलींच्या भागात ही घटना घडली. हे दोन्ही जवान दुचाकीवरून गस्त घालत असता ताडबाऊली गावाजवळ झालेल्या ‘आयईडी’ स्फोटात गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे नक्षलवादविरोधी विभागाचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितले. ‘बीएसएफ’ने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईने नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला. शहीद संतोष यांचे पार्थिव विमानाने गोव्यात आणून  तेथून बुधवारी सकाळी हलगा येथे येणार आहे.

संतोष  पाच वर्षांपूर्वी ‘बीएसएफ’मध्ये दाखल झाले. वर्षभरापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. चार महिन्यापूर्वी सुट्टीनिमित्त ते घरी येऊन गेले होते. एकुलता एक चिरंजीव असतानाही देशसेवेसाठी सैन्यात दाखल होण्याच्या त्याच्या निर्णयाला कुटुंबीयांनी कधीच विरोध केला नाही. मित्रांमध्ये रमणार्‍या संतोषच्या वीरमरणाने परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. संतोष यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी व तीन बहिणी असा परिवार आहे.