Fri, Mar 22, 2019 07:43होमपेज › Belgaon › सोशल मीडिया बनला चिखलफेकीचे माध्यम

सोशल मीडिया बनला चिखलफेकीचे माध्यम

Published On: May 03 2018 12:15AM | Last Updated: May 02 2018 11:48PM बेळगाव : प्रतिनिधी

सीमाप्रश्‍न, मराठी भाषा संस्कृती, म. ए. समितीची चळवळ, न्यायालयीन लढा, त्यासाठी दिलेले योगदान यासंबंधी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत असताना नेते व कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांवर शाब्दिक तोंडसुख घेण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. सीमाभागातील मराठी वृत्तपत्राची भूमिका, अंतर्गत गटतट, मतभेद, प्रतिक्रियाचे उघडपणे प्रदर्शन मांडत आहेत. 

जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण गरम होत आहे. सोशल मीडियावर नेते, कार्यकर्ते एकमेकांची उणीधुणी काढण्यात मग्न आहेत. प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार राहावा, अशी मराठी मतदारांची भावना आहे. मात्र त्यांच्या भावनांचा विचार न करता दिग्गज नेत्यांनी हेकेखोर भूमिका घेऊन आपल्या पसंतीच उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाला शह देण्यासाठी एका उमेदवाराची गरज असताना त्या ठिकाणी दोन मराठी उमेदवार निवडणूक लढवित आहेत. 

निवडणुकीचे वारे वाहू लागताच म. ए. समितीमध्ये एकीचा सूर उमटला. महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी एकी करण्याची सूचना केली. दक्षिण, उत्तर व ग्रामीणमध्ये म. ए. समितीचा एकच उमेदवार रिंगणात राहिल्यास विजयाची खात्री निश्चित होती. मात्र उमेदवारी अर्ज भरणा करण्यापासून अर्ज प्रक्रिया माघार घेईपर्यंत दुफळी कायम राहिली.  सीमाभागातील मराठी मतदारांची भूमिका एकीची आहे. मग तो कोणत्याही गटाचा असो एकाच छताखाली सर्वांनी यावे. मात्र दिग्गज नेत्यांचा इगो दुखावल्याने परिस्थिती उलटी झाली. त्यांना एकी नको असून आपल्या पसंतीचा उमेदवार हवा, याची उघडपणे चर्चा होत आहे. त्याचे पडसाद पहिल्यापासून सोशल मीडियावर उमटू लागले आहेत. 

सीमाप्रश्‍न, मराठी संस्कृती, सीमाप्रश्‍नी न्यायालयीन लढा, त्यासाठी होणार्‍या दिल्लीच्या वार्‍या, सीमाप्रश्‍न खटला चालविण्यासाठी येणारा खर्च, सत्ता नसतानाही लोकांच्या मुलभूत गरजा मिळविण्यासाठी केलेली आंदोलने, बेळगावात एक मराठा लाख मराठा मराठा मूक क्रांती मोर्चाचे आयोजन, सीमाभागातील मराठी दैनिकांची भूमिका या संबंधी सोशल मीडियावर  प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

 विधानसभा निवडणूक प्रचाराचा जोर असून घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील वाडी-वस्त्यांवरही सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. घरोघरी गाठीभेटी आणि सोशल मीडिया असा दोन्ही बाजूने प्रचार शिगेला पोहोचला आहे.

कोणतीही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत लवकर पाहोचत आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागही इंटरनेटशी जोडला गेला आहे. आजकाल नेटवर्क कंपन्या, हायटेक मोबाईलची वाढती संख्या लक्षात घेता सोशल  मीडियाचे जाळे सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे आज सवार्र्ंच्या हातात अत्याधुनिक मोबाईल दिसत आहेत. त्यामुळे इंटरनेटच्या वापरात मोठ्या प्रमाणात भर पडली आहे.  व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, ट्विटरसारख्या माध्यमातून दूरवर असलेल्या अनेक नागरिक जवळ आले आहेत. शिवाय चालू घडामोडी एका मिनिटात हजारो लोकांपर्यंत पोहचवणे सोपे झाले आहे.  खानापूरसह आजूबाजूच्या खेडोपाड्यांतही असेच चित्र दिसत आहे.

वाड्या-वस्त्यांवरही सोशल मीडिया

इंटरनेटच्या वाढत्या वापराबरोबर अँड्रॉईड मोबाईलचा वापरही वाढल्याने अनेक गोष्टी सुलभ झाल्या आहेत. मात्र, त्याचा दुसरीकडे तितक्याच प्रमाणात अतिरेक वाढला आहे. काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविण्याचे काम करतात. त्यामुळे समाजस्वास्थ धोक्यात येते. विधानभा निवडणुकीच्या प्रचारातही बर्‍यापैकी फायदा होताना दिसत आहे. प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, सभा वा प्रचाराचे प्रसारण यातून होताना दिसत आहे. त्यामुळे नेते, कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाचा वापर वाढला आहे.

Tags : Social Media, Election  Campaign, Facebook