होमपेज › Belgaon › स्मार्टसिटी पर्वाला सोमवारपासून सुरुवात

स्मार्टसिटी पर्वाला सोमवारपासून सुरुवात

Published On: Dec 02 2017 12:40AM | Last Updated: Dec 01 2017 10:27PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

गेली अडिच वर्षे केवळ चर्चेचा विषय बनलेल्या स्मार्टसिटी योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, मनपा आयुक्त आणि स्मार्टसिटी योजनेचे विशेषाधिकारी  शशिधर कुरेर यांनी सोमवार दि. 4 पासून स्मार्टसिटी योजनेतील कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती दिली आहे.शहरातील 2 प्रमुख रस्त्यांच्या सुधारणेबरोबरच व्हॅक्सिन डेपोत शेततळी कामांना सोमवारी सुरुवात होणार आहे.

गेल्या अडिच वर्षांच्या काळात स्मार्टसिटी कामांचा जोरदार बोलबाला होत असताना प्रत्यक्षात कोणत्याच कामाला सुरुवात झाली नव्हती. या योजनेतील केंद्र सरकारच्या अटी नियमांचे काटेकोर पालन करताना मनपा अधिकार्‍यांच्या नाकीनऊ आले होते. विविध समितींमध्ये नावांचा समावेश करण्यावरुनही राजकारण होऊ लागले.

अडिच वर्षे उलटूनही स्मार्ट सिटीतील कामांना सुरुवात होत नसल्याने नागरिकांमधून योजनेसंदर्भात शंका उपस्थित केल्या जात होत्या.प्रसारमाध्यमांमध्ये योजनेवरुन प्रशासनाविरोधात टीका होऊ लागली होती. या पार्श्‍वभूमीवर आयुक्‍त कुरेर यांनी सोमवारपासून स्मार्टसिटी योजनेतील कामांना सुरुवात होत असल्याची माहिती देत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला आहे.

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी स्मार्टसिटी योजनेतील कामांबाबत चर्चा करण्यात आली असल्याचे कुरेर यांनी सांगितले.त्याचबरोबर सोमवारी उत्तर भागातील केपीटीसीएल व दक्षिण भागातील मंडोळी रस्ता सुधारणा कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. 2 रस्त्यांच्या सुधारणेसाठी 22.80 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपोत हेरिटेज पार्क बनविण्यात येत आहे. हेरिटेज पार्कमध्ये शेततळी बनविण्याचे काम सोमवारी सुरू होत असून शेततळ्यासाठी 3.80 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

सोमवारी रस्ते आणी शेततळी कामाला सुरुवात होईल. त्यानंतर नियंत्रण कक्षाच्या कामाच्या निविदा मागविण्यात आल्या असताना त्या कामालाही तात्काळ सुरुवात होईल.विविध ठिकाणी अत्याधुनिक पध्दतीचे बसस्टॉप, बस-वे, स्वच्छ पाण्याची यंत्रणा, पाणी अडवा-पाणी जिरवा प्रकल्प यासाठी निविदा मागविण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे कुरेर यांनी सांगितले.