Wed, Aug 21, 2019 19:04होमपेज › Belgaon › ‘स्मार्ट फोन’कडून पुन्हा साध्या फोनकडे !

‘स्मार्ट फोन’कडून पुन्हा साध्या फोनकडे !

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 05 2018 9:25PM खानापूर : वासुदेव चौगुले

एक काळ होता, निवडणुकांचा प्रचार मतदारांच्या गाठीभेटींद्वारे केला जात असे. मात्र आता प्रचाराची साधनेही डिजीटल झाली. सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार असल्याने जो-तो स्मार्ट फोनवरील बोलण्यापासून ते सोशल मीडियावरील संभाषणापर्यंत प्रचंड खबरदारी बाळगत आहे.

निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांची फोडाफोडी, पैशांचे वाटप, आर्थिक व्यवहारांचे सेटिंग  या बाबींना उधाण येते. त्यासाठी मोबाईलचाच आधार घ्यावा लागतो. मात्र निवडणूक आयोगाने या वेळेच्या निवडणुकीत सोशल मीडियावरही करडी नजर राहणार असल्याचे जाहीर केल्याने नेते जण निवडणुकीसंबंधीचे व्यवहार करताना पुरेशी खबरदारी घेण्यावर भर देत आहे. स्मार्ट फोनमधील स्मार्ट अ‍ॅप्समुळे नाहक अडकले जाऊ, अशी भीती इच्छुक व त्यांच्या समर्थकांना लागून राहिली आहे.

व्हॉईस रेकॉर्डर, कॉल रिकॉर्डिंग, ट्रू कॉलर यासारख्या अ‍ॅपमुळे स्मार्ट फोनद्वारे होणारे संभाषण सहज क्रॅक करता येते. त्यामुळे गोपनीय माहितीचा पर्दाफाश होऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या चौकशीच्या फेर्‍यात अलगद अडकले जाण्याची भीतीही लागून राहिल्याने शक्यतो स्मार्टफोनवर जेमतेम व आवश्यक संभाषण केले जात आहे.

याकामी संवादासाठी जुने साधे फोन अधिक सुरक्षित वाटू लागल्याने बाजारात त्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. स्मार्टफोनचा जमाना आल्याने बटणांचे जाडजुड फोन जवळपास इतिहासजमा झाले. दुकानांमध्येही असे फोन मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी ऑनलाईन शॉपिंगद्वारे अशा फोनची खरेदी करावी लागत आहे. केवळ फोन करणे आणि आलेला कॉल स्वीकारणे, याव्यतिरिक्त गणिती क्रिया आणि एखाददुसरा सुडोकूसारखा खेळ ही या साध्या फोनची वैशिष्ट्ये आहेत. यामुळे वापरकर्त्याचा इंटरनेट व समाज माध्यमांशी कसलाही संबंध येत नसल्याने अशा फोनचा वापर अधिक सुरक्षित मानला जात आहे.

गत निवडणुकीत व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक या समाज माध्यमांचा शहरी भागात प्रचारासाठी बर्‍यापैकी वापर झाला. मात्र ग्रामीण भागात सोशलचे जाळे तितके विस्तारले नसल्याने यापासून खेडी अलिप्तच होती. मात्र सध्या सोशलने गल्लीबोळ आणि वाडी-वस्तीवरही इंटरनेट साक्षरता पोहचविल्याने त्याच्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने कमालीची  सतर्कता दाखवली आहे.