Wed, Apr 24, 2019 21:32होमपेज › Belgaon › ‘स्मार्ट’ महानगरपालिकेत गोंधळात गोंधळ!

‘स्मार्ट’ महानगरपालिकेत गोंधळात गोंधळ!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

चंदीगड दौर्‍यावरुन आलेल्या मनपा सदस्यांनी मंगळवारी सभागृहात चंदीगड आणि बेळगाव शहरातील विविध कामांचे मूल्यमापन करताना शहर विकासात आपण किती मागे आहोत, याचा दाखला आपल्या मुखाने दिला. गेल्या चार वर्षांच्या काळात विद्यमान सभागृहातील कामकाज शहरवासीयांना चिंतेचा आणि संतापाचा विषय बनला आहे. वचक नसल्याने अधिकारी मग्रुर बनले तर नगरसेवक पद आणि अर्थकारणासाठी बेभान झाले आहेत. बर्‍याच नगरसेविका महत्वाच्या कामात रस घेताना दिसत नाहीत. त्यातच नगरसेविका सरला हेरेकर यांच्या बेतालपणाने कळस गाठला असताना त्याला आवर घालण्यात महापौर अपयशी ठरल्या आहेत.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी  एक वर्षाचा कालावधी शिल्‍लक आहे. विद्यमान सभागृहाची चार वर्षे केवळ गोंधळात खर्च झाली आहेत. प्रत्येकवर्षी मिळणार्‍या 100 कोटी रुपये विशेष अनुदानातून महत्त्वाची विकासकामे, तातडीचे प्रकल्प राबविण्याऐवजी सर्व निधी रस्ता, गटार, सौंदर्यीकरणाची किरकोळ कामे यावर खर्च करण्यात आला आहे.

महापालिकेतील कामकाज टक्केवारीवर चालते, याची सर्वांनाच चांगली जाणीव आहे. मनपाच्या अर्थकारणात मुरलेले अधिकारी ज्येष्ठ सदस्यांना हाताशी धरुन आपला गाडा चालवितात. जेष्ठांच्या इशार्‍यावर मनपात समझोत्याचा कलगीतुरा रंगविला जातो. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असा प्रकार मनपा सभागृहात कायमच पाहायला मिळतो. अनेक कामात सत्ताधारी आणि विरोधकांत साटेलोटे असते.सत्ताधारी आणी विरोधकांच्या समझोता राजकारणात अधिकार्‍यांचे फावते. त्यामुळेच आतापर्यंत अनेकवेळा अधिकार्‍यांच्या विरोधात सदस्यांनी रान उठविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्याविरोधात थेट कारवाई करण्याचे समझोता एक्स्प्रेसला जमलेले नाही.

गेल्या चार वर्षांच्या काळात सभागृहात झालेल्या अनेक निर्णयांची अंमलबजावणी झालेली नाही.वेळोवेळी अधिकार्‍यांची झाडाझडती घेऊन ठराव अंमलबजावणीची माहिती घेण्याचे भान एकाही महापौरांना राहिले नाही. स्मार्ट सिटी योजनेची अडिच वर्षे केवळ प्रकल्पांचा बागलबुवा करण्यावर  खर्ची घालण्यात आली. स्मार्ट सिटीतील एकही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. शहरात रहदारीची समस्या जटिल बनली आहे. रेल्वे उड्डाणपुलाच्या कामानंतर रहदारी समस्येत भर पडली आहे.रहदारी समस्येला प्रशासन कारणीभूत असताना महापौर आणी सदस्यांना जिल्हाधिकार्‍यांना भेटून नागरिकांना होणार्‍या त्रासाची जाणीव करुन देता आली नाही.

महापालिकेत अनेक वर्षे काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी विद्यमान सभागृहाचे कामकाज विनोदाचा विषय बनला आहे. यावरुनच  सभागृहाच्या प्रतिष्ठेच्या कारभाराची जाणीव होत असते.