होमपेज › Belgaon › ‘स्मार्ट’ खटाटोप दिल्‍ली दौर्‍यासाठीच

‘स्मार्ट’ खटाटोप दिल्‍ली दौर्‍यासाठीच

Published On: Dec 08 2017 1:36AM | Last Updated: Dec 08 2017 12:13AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहराची स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली. दोन वर्षे उलटूनही योजनेतील कामांचा पत्ताच दिसत नव्हता; मात्र रविवारी अचानकपणे स्मार्ट सिटीतील काही कामांचा प्रारंभ करण्यात आल्यानंतर बेळगावकरांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला. दरम्यान, शुक्रवारी होणार्‍या दिल्ली येथील स्मार्ट सिटी केंद्रीय आढावा बैठकीसाठी रविवारचा खटाटोप करण्यात आल्याचे कळते.

स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशातील 20 शहरांवी निवड करण्यात आली. त्यामध्ये बेळगाव शहराचा समावेश आहे. केंद्राने जाहीर केलेल्या 20 शहरांपैकी बहुसंख्य शहरात केंद्राच्या महत्त्वाकांक्षी योजनेला गेल्या दोन वर्षांत चालना मिळालेली नाही. याची माहिती केंद्रीय नगर विकास खात्याला मिळाली आहे.त्यामुळेच शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय नगरविकास खात्याच्या वतीने स्मार्ट सिटी योजनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगाव मनपा आयुक्‍त आणी स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर उद्याच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. बैठकीत गेल्या दोन वर्षांत स्मार्ट सिटीअंतर्गत झालेल्या कामकाजाची माहिती कुरेर यांना द्यावी लागणार आहे. गेल्या दोन वर्षांत स्मार्ट सिटी योजनेवर केवळ चर्चेची गुर्‍हाळे रंगली होती. प्रत्यक्ष कामाचा पत्ताच नव्हता. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीसाठी मनपा सदस्यांना डावलून बेळगावात स्मार्ट सिटी योजनेतील कामांना घाईगडबडीत सुरुवात करण्याचा आटापिटा करण्यात आल्याची चर्चा आहे.