Sun, Jul 21, 2019 12:32होमपेज › Belgaon › स्लॅब कोसळून युवक ठार

स्लॅब कोसळून युवक ठार

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 23 2018 12:44AMनिपाणी : प्रतिनिधी

जोराचा पाऊस आल्याने पडझड झालेल्या इमारतीमध्ये निवार्‍याला थांबलेल्या पाच युवकांच्या अंगावर स्लॅब कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना मंगळवारी रात्री घडली. भिवशी-आडी रोडवरील बेघर वसाहतीतील घटनेत एकजण गंभीर झाला असून तिघे किरकोळ जखमी आहेत. 

रोहित बाबुराव कुरणे (वय 22, रा. भिवशी) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. गंभीर जखमी वैभव विलास म्हाळुंगे (22, रा. भिवशी) याच्यावर कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रणित श्रीरंग पाटील (21), कृष्णात राजेंद्र पाटील (24), विशाल महादेव पाटील (28) या तिघांवर सरकारी महात्मा गांधी रूग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.

भिवशी-आडी रोडवरील बेघर वसाहतीकडे पाचजण काही कामानिमित्त गेले होते. या वसाहतीत सध्या कोणीही रहावयास नाही. परत येत असताना जोराचा पाऊस आल्याने नजीक इमारतीच्या आडोशाला थांबले. अचानकनपणे स्लॅब कोसळल्याने रोहित कुरणे याचा जागीच मृत्यू झाला. वैभव  म्हाळुंगे गंभीर जखमी झाला आहे. किरकोळ जखमी झालेल्या तिघांनी गावात माहिती दिली. तत्काळ मृत व जखमींच्या नातेवाईकासह ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने स्लॅब हटवून रोहितचा मृतदेह बाहेर काढला. वैभवला उपचारासाठी कोल्हापुरला हलविले. 

घटनास्थळी चिकोडीचे तहसीलदार चिंदबर कुलकर्णी व निपाणीचे सर्कल बी. एस. वटगुडे यांनी भेट देऊन पाहणी केली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक के. एस. कल्लाप्पगौडर, हवालदार प्रकाश साबोजी, एन. एस. पुजारी यांनी भेट देऊन पाहणी  केली.

बुधवारी सकाळी शवविच्छदेन करुन रोहितचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रोहितने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.