होमपेज › Belgaon › सहा विद्यापीठांना कुलगुरूच नाहीत

सहा विद्यापीठांना कुलगुरूच नाहीत

Published On: Jul 12 2018 1:40AM | Last Updated: Jul 11 2018 10:01PMबेळगाव : प्रतिनिधी

धारवाड कृषी विद्यापीठ, कर्नाटकातील पहिल्या म्हैसूर विद्यापीठासह एकूण सहा विद्यापीठांवर कायमस्वरूपी कुलगुरुंची नियुक्‍ती करण्यात आलेली नाही. सरकार आणि राजभवन यांच्यातील संघर्षामुळे विद्यापीठ नियुक्‍तीकडे दुर्लक्ष झाले आहे.बागलकोट विद्यापीठ वगळता इतर पाच विद्यापीठांचे कुलगुरूपद रिक्‍त होऊन दोन महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे. म्हैसूर विद्यापीठावर गेल्या दीड वर्षापासून कुलगुरूच नाहीत. या काळात पाच हंगामी कुलगुरूंची नियुक्‍ती करण्यात आली. कुलगुरूंच्या अनुपस्थितीत कुलसचिव, हंगामी कुलगुरूंकडून विद्यापीठातील दैनंदिन शैक्षणिक कामकाज चालत आहे. मात्र, विद्यापीठाचा सर्वांगीण विकास, संशोधन, प्राध्यापक तसेच इतर कर्मचार्‍यांची नियुक्‍ती, संशोधन याकडे दुर्लक्ष होत आहे. 

धारवाड, बंगळूर आणि रायचूर कृषी विद्यापीठांवर कायमस्वरूपी कुलगुरूंची नियुक्‍ती झालेली नाही. बंगळूर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एच. शिवण्णा निवृत्त होऊन चार महिने झाले तरी नियुक्‍ती झाली नाही.  डॉ. एम. एस. नटराज प्रभारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. रायचूर विद्यापीठाचे कुलगुरूपद 28 फेब्रुवारीपासून रिक्‍त आहे. रजिस्ट्रार आणि ज्येष्ठ केएएस अधिकारी गुत्ती जंबुनाथ प्रभारी कुलगुरू म्हणून अतिरिक्‍त कार्यभार सांभाळत आहेत. धारवाड कृषी विद्यापीठाचीही अशीच परिस्थिती आहे.

प्रभारींना मोजकेच अधिकार

हंगामी किंवा प्रभारी कुलगुरूंना कोणताही स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नाही. नव्या नेमणुका, मोठ्या रकमेचे प्रस्ताव, तातडीच्या प्रस्तावावर व्यवस्थापन मंडळाची मंजुरी घ्यावी लागते. शिवाय राज्यपालांकडे त्याबाबतचे निवेदन द्यावे लागते.