Mon, Aug 19, 2019 15:19होमपेज › Belgaon › सांबर्‍यातून रोज 6 विमानांचे टेकऑफ

सांबर्‍यातून रोज 6 विमानांचे टेकऑफ

Published On: May 16 2019 2:04AM | Last Updated: May 16 2019 2:04AM
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगावहून पुणे आणि अहमदाबाद शहरांसाठी बुधवारपासून विमानसेवा सुरू झाली. सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्या हस्ते केक कापून आणि पहिल्या प्रवाशाचे स्वागत करून सेवेचे उद्घाटन झाले. पहिल्या दिवसाच्या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आजच्या या सेवेमुळे आता सांबरा विमानतळावरून दररोज सहा विमानांचे ‘टेक ऑफ’ होणार आहे.

पुणेसाठी अलायन्स आणि अहमदाबादसाठी स्टार एअरची विमान सेवा आहे.  पुणे शहरासाठी अलायन्सची सेवा मंगळवार वगळता इतर दिवशी राहणार आहे. हे विमान बंगळूरहून दुपारी 3.40 वाजता येणार असून, 4.05 वाजता पुण्याला जाणार आहे. त्यानंतर हेच विमान पुण्याहून बेळगावला सायंकाळी 7 वाजता येणार असून सायंकाळी 7.30 वाजता बंगळूरला रवाना होणार आहे. स्टार     एअरच्यावतीने अहमदाबाद शहरासाठी रविवार वगळता इतर दिवशी सेवा राहणार आहे. बंगळूरहून सकाळी 8.40 वाजता विमान बेळगावात येणार असून हे विमान सकाळी 9.20 वाजता ते अहमबादकडे रवाना होणार आहे. त्यानंतर दुपारी हेच विमान 1 वाजता बेळगावात येणार असून, त्यानंतर दुपारी 1.50 वाजता ते बंगळूरला रवाना होणार आहे. आजच्या  वाढलेल्या दोन उड्डाणांमुळे सांबरा विमानतळावरुन रोज सहा उड्डाणे होणार आहेत. यामध्ये तीन बंगळूरसाठी तर अहमदाबाद, पुणे आणि हैद्राबादसाठी प्रत्येकी एक उड्डाण राहील. 

85 टक्के प्रतिसाद
स्टार एअरच्या अहमदाबादला सेवेला पहिल्या दिवशी सुमारे 85 टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. बेळगाव - अहमदाबादसाठी 43 प्रवाशी तर अहमदाबाद - बेळगावसाठी 41 प्रवाशी होते. बेळगाव - बंगळूरसाठी 42 प्रवाशी होते. अलायन्सच्या बेळगाव - पुणेसाठी 25 प्रवाशी होते.