Thu, Jun 27, 2019 16:49होमपेज › Belgaon › चारही अध्यक्षपदे ‘मराठी’कडे

चारही अध्यक्षपदे ‘मराठी’कडे

Published On: Jul 06 2018 1:31AM | Last Updated: Jul 06 2018 12:07AMबेळगाव : प्रतिनिधी

मनपातील सत्ताधारी मराठी गटाने जाहीर केलेल्या अध्यक्ष निवडीनुसार आरोग्य स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सुधा भातकांडे, कर समितीच्या अध्यक्षपदी पुंडलिक परीट, तर शहररचना समितीच्या अध्यक्षपदी मोहन भांदुर्गे यांची निवड झाली. मात्र, लेखा समिती अध्यक्षपदी नाट्यमयरीत्या वैशाली हुलजी यांची वर्णी लागली. तीही चक्‍क कन्‍नड गटाच्या पाठिंब्याने. परिणामी मराठी गटाने त्यांना बंडखोर ठरवले असून, गटातर्फे सत्कारही हुलजी यांना वगळून उर्वरित तिघांचाच करण्यात आला.

गुरुवारी दुपारी मनपा सभागृहात महापौर बसाप्पा चिक्‍कलदिनी याच्या अध्यक्षतेखाली चौघांची निवड जाहीर करण्यात आली. मराठी गटाची सत्ता असल्याने चारही स्थायी समित्यांची अध्यक्षपदे कुणाकडे द्यायची हे आधीच निश्‍चित करण्यात आले होते. तसेच त्या नावांची घोषणाही केली होती. त्यानुसार लेखा समितीचे अध्यक्षपद राकेश पलंगे यांना दिले जाणार होते, पण लेखा समितीचे सदस्य असलेले मराठी नगरसेवक दिनेश रावळ आजारी असून, केएलई रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर पित्ताशयातील खडे काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे मराठी गटाचे एक मत कमी झाल्याची संधी साधून वैशाली हुलजी यांनी विरोधी नगरसेवक संजय सव्वाशेरी व सतीश देवर पाटील यांचा सूचक अनुमोदक म्हणून पाठिंबा मिळविला. या गद्दारीमुळे सत्ताधारी गटातर्फे नगरसेवक राकेश पलंगे यांनी अध्यक्षपदासाठी अर्जच दाखल केला नाही. त्यामुळे वैशाली हुलजी यांची महपाौर बसाप्पा चिक्‍कलदिन्नी यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

बिनविरोध का?

लेखा समितीचे सदस्य असलेले रावळ आजारी असल्यामुळे निवडणुकीला अनुपस्थित राहिले. तर वैशाली हुलजी विरोधी गटात गेल्या. त्यामुळे मराठी गटाने लेखा अध्यक्षपदासाठी अर्जच भरला नाही. कारण लेखा समितीती एकूण सात सदस्यांपैकी 4 मराठी तर 3 कन्नड आहेत. त्यापैकी रावळ यांच्या अनुपस्थितीमुळे मराठी संख्याबळ तीनवर आले. तर हुलजी यांनी कन्नड गटाशी हातमिळवणी केल्यामुळे अंतिम संख्याबळ दोनच राहिले. त्यामुळे या अध्यक्षपदासाठी मराठी गटाने अर्जच केला नाही.

गटनेते संतप्त

मराठी गटनेते संजय शिंदे यांनी वैशाली हुलजी  गद्दार बनल्याचा आरोप करून त्यांना स्वाभिमानी मराठी गटात स्थान नसल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त केली. मराठी गटातर्फे नंतर उपमहापौरांच्या  हस्ते स्थायी समिती अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. पण सत्कारासाठी हुलजी यांना बोलावण्यात आले नव्हते.

इतर निवडींत ऐक्य

आरोग्य व शिक्षण स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी मराठी गटातर्फे सुधा भातकांडे तर विरोधी गटातर्फे नगरसेवक रवी धोत्रे यांनी अर्ज दाखल केला होता. 
भातकांडे यांना चार तर रवी धोत्रे यांना तीन मते मिळाल्यामुळे महापौरांनी सुधा भातकांडे यांना अध्यक्षा म्हणून घोषित केले. 
कर व अर्थ स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून पुंडलिक परीट व शहर रचना व विकास स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून नगरसेवक मोहन भांदुर्गे यांची महापौरांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. या दोन्ही पदांसाठी विरोधी गटाने उमेदवारी दाखल केली नव्हती.

काय घडले?

तीन समित्यांची अध्यक्षपदे आधी ठरलेल्या मराठी नगरसेवकांकडेच
लेखा समितीचे अध्यक्षपद ठरले होते पलंगे यांना
मात्र मराठी गटाचे दिनेश रावळ रुग्णालयात असल्याने गैरहजर
त्यांच्या अनुपस्थितीमुळे मराठी, कन्नड सदस्यसंख्या समसमान
ऐनवेळी वैशाली हुलजी विरोध नगरसेवकांच्या पाठिंब्याने रिंगणात
मराठीकडे दोनच नगरसेवक राहिल्याने ‘लेखा’साठी अर्जच नाही