होमपेज › Belgaon › नंदगडच्या आरतीने एकहाती वाजाविला दुबईत डंका

नंदगडच्या आरतीने एकहाती वाजाविला दुबईत डंका

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 20 2017 10:23PM

बुकमार्क करा

बेळगाव : संदीप तारीहाळकर

मुळची नंदगड (ता.  खानापूर) सध्या उचगाव, कोल्हापूर येथील आरती ज्ञानोबा पाटील हिने दुबई येथे पार पडलेल्या दि एशियन बुथ पॅरा गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करीत पॅरा बॅडमिंटनमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. एकहाती आरतीची कर्तबगारी सातासमुद्रापार पोहोचल्याने खानापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ज्ञानोबा पाटील हे गवंडी कामानिमित्त कोल्हापूर येथे स्थिरावले आहे. आई भारती गृहिणी तर एक भाऊ प्रसादही गवंडी काम करतो.   घरच्या हलाखीच्या परिस्थितीत पै-पै उभा करून आरतीने हे उत्तुंग यश संपादन केले आहे. आरती सध्या कोल्हापूर येथील गोपाल कृष्ण गोखले महाविद्यालयात बी.ए. च्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत आहे. आरतीने यापूर्वीही टोकियो, जपान येथे पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. आरतीच्या दिव्यांगाला स्वीकारत आई-वडील आणि भाऊ प्रसाद यांनी तिला भक्कम पाठबळ दिले आहे. आतापयंर्ंत तिने मैदानी खेळ, गोळाफेक, बॅडमिंटन अशा विविध खेळात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 

आतापयर्ंत तिने 21 सुवर्ण पदके, 9 कास्यपदके, 10 रौप्यपदके व अन्य  पुरस्कार पटकाविले आहेत. दुबई स्पर्धेपूर्वी पुणे येथे पी. वाय. सी. हिंदू जिमखाना येथे तिने प्रशिक्षक वरुण खानवलकर यांच्यासह दिल्ली येथील प्रशिक्षक गौरव खन्ना यांचे मार्गदर्शन घेतले. कोल्हापूर येथे महेश जाधव, केदार नाडगौंडे  यांचे प्रशिक्षण लाभले. दुबईतील स्पर्धेत महम्मद अरवाज अन्सारी हा साथीदार होता. या दोघांनी इंडोनेशियाच्या साधीया व संयुक्त अरब अमिरातच्या हुमैदअल सानानी व सलामा आलखतेरी  यांच्या विरुद्ध लढत यशस्वी केली. आता यापुढे 2020 मध्ये टोकियो येथे होणार्‍या समर पॅरालिंपिक स्पर्धेचे टार्गेट आरतीने ठेवले आहे.

2008 मध्ये राज्यस्तरीय पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत धावणेत उज्वल यश संपादन केले आहे. 2010 मध्ये दि महाराष्ट्र स्टेट पॅरालिम्पिक असोसिएशन (नागपूर) येथील अपंग खेळाडूसाठीचा ‘साफल्य’ हा पुरस्कार तत्कालिन केंद्रीय मंत्री विलास मुत्तेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. हरियाणा, दिल्ली, चंदीगढ, राजस्थान, चेन्नई याठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अनेक पदके पटकाविली आहेत.