Mon, Mar 25, 2019 04:57
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › सिद्धरामय्यांनी राज्याला मागे नेले

सिद्धरामय्यांनी राज्याला मागे नेले

Published On: Apr 14 2018 7:29AM | Last Updated: Apr 14 2018 1:56AMनिपाणी : प्रतिनिधी

गेल्या 5 वर्षात राज्यातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने कर्नाटकाला विकासाच्या बाबतीत मागे नेले आहे. राहुल बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे चार वर्षांचा हिशेब मागत आहेत. काँगे्रसने चार पिढ्यांचा हिशेब द्यावा. राज्यात महिलांची सुरक्षा धोक्यात असून कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले.
निपाणी येथील म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर भाजपच्या वतीने भव्य महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी अमित शहा बोलत हेाते. ते म्हणाले, मातृशक्‍तीचा आशीर्वाद महत्त्वाचा असून येथील गर्दी पाहता विधानसभेच्या निवडणुकीबरोबर भाजप 2019 ची लोकसभा निवडणूकही जिंकेल. महिलांची सुरक्षा, त्यांचे कल्याण आणि सन्मान करण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरले आहे.  कर्नाटकात भाजपची त्सुनामी येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. 

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा म्हणाले, समाजाच्या प्रगतीत महिलांचा वाटा मोठा आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला होता. दलित समाज आणि डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राज्यात गेल्या 5 वर्षात कायदा व सुव्यवस्था बिघडली असून सर्व पातळीवर सिद्धरामय्या सरकार अपयशी ठरले आहे. महिलांवरील अत्याचार वाढले असून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. आ. शशिकला जोल्लेंच्या नेतृत्वाखाली निपाणीत महिलांचे संघटन झाले आहे ते राज्यात आदर्शदायी ठरो. 

आ. शशिकला जोल्ले म्हणाल्या, निपाणीपासून विधानसभेचे कुरूक्षेत्र सुरू झाले आहे. अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला राज्यात विजयश्री मिळणार आहे. त्यासाठी नारी शक्‍तीचा आशीर्वाद महत्वपूर्ण ठरणार आहे. महिला सबलीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालविलेले कार्य प्रेरणादायी आहे. 
यावेळी राज्य महिला अध्यक्षा भारती शेट्टी व अ‍ॅड. संजय शिंत्रे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर खा. प्रल्हाद जोशी, खा. डॉ. प्रभाकर कोरे, खा. सुरेश अंगडी, आ. महांतेश कवटगीमठ, आ. दुर्योधन ऐहोळे, रमेश कत्ती, अमित कोरे, शशिकांत नाईक, बाबा देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Tags :Siddharamy took , state back ,belgaon news