Sun, Jun 16, 2019 02:40होमपेज › Belgaon › सिद्धरामय्यापुत्राला मिळणार मंत्रिपद?

सिद्धरामय्यापुत्राला मिळणार मंत्रिपद?

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 8:15PMबंगळूर : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे पुत्र आणि वरुणा मतदारसंघाचे आमदार डॉ. यतिंद्र यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. तब्बल चार बसगाड्या भरून त्यांचे समर्थक बंगळूरला दाखल झाले असून, त्यांनी सिद्धरामय्यांकडेच तसा आग्रह धरला आहे. गेल्या विधानसभेत वरुणा मतदारसंघातून आमदार असलेल्या सिद्धरामय्यांनी यंदा पुत्रासाठी हा मतदारसंघ सोडला आणि चामुंडेश्वरी व बदामी या दोन मतदारंसघातून निवडणूक लढवली. पैकी चामुंडेश्वरीतून ते पराभूत झाले, तर बदामीमधूनही सुमारे 600 मतांनीच निवडून आले. मात्र त्यांचे पुत्र डॉ. यतिंद्र वरुणामधून भरघोत मतांनी निवडून आले. आता त्यांचा समावेश मंत्रिमंडळात करावा, यासाठी लॉबिंग सुरू झाले आहे.

रविवारी रात्री यतिंद्र यांचे समर्थक बंगळुरात पोहचले. त्यांनी सिद्धरामय्यांकडे मंत्रिपदासाठी आग्रह धरला आहे. मात्र सिद्धरामय्या हा आग्रह पक्षाध्यक्षांकडे पोचवतील का याबाबत साशंकता 
आहे.काँग्रेसने निजदला पाठिंबा देऊन मुख्यमंत्रिपद एच. डी. कुमारस्वामींना देऊ केल्यामुळे मागच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री राहिलेले सिद्धरामय्या यंदाच्या मंत्रिमंडळात राहणार नाहीत, अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काँग्रेस-निजद युतीचे समन्वयकपद देण्याची तयारी चालली आहे. तसे झाल्यास स्वतःच्या मंत्रिपदाच्या बदल्यात सिद्धरामय्या पुत्रासाठी मंत्रिपद मागू शकतात. तथापि, ही शक्यता काहीशी धूसर आहे.

येडियुराप्पांचे उदाहरण

भाजप नेते बी. एस. येडियुराप्पा 2011 मध्ये मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यात त्यांचे पुत्रप्रमेच कारणीभूत आहे. बंगळूर शहरातील सुमारे दोन एकर आरक्षित जमिनीवर आरक्षण येडियुराप्पांनी आपले पुत्र बी. वाय. विजयेंद्र आणि बी. वाय. राघवेंद्र यांच्या सांगण्यावरून रद्द केले होते. पुढे ती जमीन या दोन्ही बंधूंच्या नावे असलेल्या कंपनीला हस्तांतरित करण्यात आली होती. याच मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपला घेरले आणि येडियुराप्पांना राजीनामा द्यावा लागला होता. येडिंचे उदाहरण समोर असल्यामुळे सिद्धरामय्या पुत्र यतिंद्रसाठी आग्रह धरणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.