Thu, Aug 22, 2019 12:44होमपेज › Belgaon ›  माफी मागा; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदी यांना नोटिस

 माफी मागा; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदी यांना नोटिस

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 1:44AMबंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकार म्हणजे दहा टक्के कमिशनचे सरकार असल्याचा आरोप केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली असून, माफी मागा, अन्यथा 100 कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दावा ठोकणार, असा सज्जड इशारा दिला आहे.

कर्नाटकातील सरकार नंगानाच  करणारे सरकार असून महागडे घड्याळ स्वीकारल्याप्रकरणी पंतप्रधानांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. कोणतीही टीका करण्यापूर्वी त्यासाठी पुरावा आवश्यक आहे.कोणत्याही आधाराशिवाय काँग्रेस सरकार आणि आपल्याला वैयक्‍तिकपणे लक्ष्य बनविण्यात आले. अशा आरोपांप्रकरणी पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी, असे सिद्धरामय्यांनी वकिलांकरवी जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे.  

फेब्रुवारी महिन्यात कर्नाटक दौर्‍यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतले होते. ‘सिद्धरामय्या नव्हे सिधा रुपैय्या सरकार, दहा टक्के कमिशनचे सरकार’ असा उल्लेख करताना कोणतेही काम असले तरी सरकारकडून त्यासाठी कमिशन घेतले जाते, असा आरोप मोदींनी केला होता.  त्यामुळेही काँग्रेस कायदेशीर मार्ग अवलंबत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजपने इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींमध्येही सरकारविरोधात अपमानास्पद मजकूर आहे.  पण, हे आरोप बिनबुडाचे आहेत. यामुळे मुख्यमंत्री आणि सरकारविरोधात जनतेत चुकीचा संदेश पोहोचतो. त्यामुळे पंतप्रधानांनी माफी मागावी, अन्यथा भादंवि कलम 499, 500, 501 आणि 502 नुसार पंतप्रधानांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस.येडियुराप्पा आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनाही ही नोटिस पाठवण्यात आली आहे. भाजपचे आमदार व्ही. एस. उग्रप्पा यांनी ही नोटिस जारी केली आहे. 

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मुधोळमधील सभेत काँग्रेसवर टीका करताना काँग्रेस नेत्यांनी मुधोळच्या कुत्र्यांकडून तरी राष्ट्रनिष्ठा शिकावी, अशी टीका केली होती. मुधोळचे कुत्रे लष्करात सेवा बजावतात. तथापि, या वक्तव्यावरूनही मोदींवर काही जणांकडून टीका होत आहे. टीकेची खालची पातळी पंतप्रधानांनी गाठल्याचे अभिनेते प्रकाश राय यांनी म्हटले आहे.

‘जेलबर्ड’नंतर नोटिशींना वेग

काँग्रेसने प्रचारकाळात येडियुराप्पांचा उल्लेख ‘जेलबर्ड’ अर्थात ‘कारागृहवासी’ असा केला होता. हा उल्लेख केला जाऊ नये, यासाठी भाजपने बंगळूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने काँग्रेसला म्हणणे मांडण्यासाठी नोटिस पाठवली आहे. त्यामुळे काँग्रेसने आता भ्रष्टाचारांच्या आरोपांवर भाजपला नोटिस पाठवून जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.