Thu, Sep 20, 2018 01:56होमपेज › Belgaon › सिद्धरामय्यांना डावलून सरकार चालेल का?

सिद्धरामय्यांना डावलून सरकार चालेल का?

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 27 2018 11:29PMबंगळूर : प्रतिनिधी

सिद्धरामय्या हे कर्नाटकाच्या राजकारणातील प्रमुख नेते आहेत. त्यांना डावलून सरकार चालेल का? असा प्रश्‍न सिद्धरामय्या समर्थक आमदारांनी विचारला आहे. पालिकाप्रशासन मंत्री रमेश जारकीहोळींसह 10 आमदारांनी बुधवारी सिद्धरामय्यांची भेट घेतली. बैठकीनंतर पत्रकारांनी त्यांना छेडले असता त्यांनी हा सवाल केला.

निसर्गोपचाराच्या निमित्ताने धर्मस्थळमधील उजिरे येथे गेल्या अकरा दिवसांपासून वास्तव्यास असलेले माजी मुख्यमंत्री आणि समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या वास्तव्यास आहेत. बुधवारच्या  बैठकीतून पक्षश्रेष्ठींनी आपल्याकडे दुर्लक्ष करू नये, असा स्पष्ट संदेश सिद्धरामय्यांनी रवाना केल्याचे मानले जाते.

युती सरकारचे आयुष्य केवळ आगामी ‘लोकसभेपर्यंत’च असे विधान सिद्धरामय्यांनी व्हिडिओमध्ये केल्यामुळे खळबळ माजलेली असताना आज पुन्हा मंत्री, आमदारांनी विशेष विमानाने उजिरे येथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. यामुळे युती सरकारसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. 

दहा मंत्री, आमदारांनी सिद्धरामय्यांची भेट घेऊन आल्यानंतर त्यांना पत्रकारांनी गराडा घातला. त्यावेळी केवळ सिद्धरामय्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षश्रेष्ठींकडून सहकार्याची सूचना

सिद्धरामय्यांकडे सध्या कोणतेही मोठे पद नाही. ते समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. निसर्गोपचाराच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या राजकीय खेळीची दखल पक्षश्रेष्ठी सोनिया गांधींनी घेतली आहे. त्यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी सिद्धरामय्यांशी संपर्क साधून युती सरकारला सहकार्य करण्याची सूचना दिली आहे. यामुळे आगामी काळातील घडामोडींवर सर्वांच्या नजरा खिळून आहेत.