Thu, Jun 27, 2019 01:42होमपेज › Belgaon › सिद्धरामय्यांना वेसण घालण्याचा प्रयत्न

सिद्धरामय्यांना वेसण घालण्याचा प्रयत्न

Published On: Jun 28 2018 11:21PM | Last Updated: Jun 28 2018 11:12PMबंगळूर : प्रतिनिधी

कोणत्याही कारणास्तव युती सरकार अस्थिर होऊ द्यायचे नाही, असा निर्धार काँग्रेस, निजद नेत्यांनी केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन सर्वच नेत्यांना वरिष्ठांचा सल्‍ला घेण्याचा सल्‍ला दिला आहे. निजद राष्ट्रीय अध्यक्ष खासदार एच.डी.देवेगौडा दिल्‍ली दौर्‍यावर गेले असून काँग्रेस वरिष्ठांना त्यांनी स्पष्ट संदेश रवाना केला आहे. तर उपमुख्यमंत्री परमेश्‍वर, डी. के. शिवकुमार यांनी कुमारस्वामी एकत्र येऊन सिद्धरामय्यांवर नियंत्रणासाठी डावपेच आखत आहेत.

काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. कोणत्याही विषयावर बोलावयाचे असेल तर आपापल्या पक्षश्रेष्ठी आहेत. त्यांच्यासमोर सर्व विषय मांडून त्यावर तोडगा काढला जाऊ शकतो, असा सल्‍ला मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी गुरूवार (दि. 28) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिला. यावेळी त्यांनी समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्यांचे नाव न घेता सर्वच नेत्यांना त्यांनी याबाबत सुनावले. यावेळी कोणत्याच मंत्र्याने सिद्धरामय्यांच्या विरोधात किंवा समर्थनार्थ बोलणे पसंद केले नाही. 

शिवकुमार, परमेश्‍वर एकत्र

उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर, पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार आणि कुमारस्वामी सिद्धरामय्यांविरोधात एकत्र आले आहेत. त्यांच्यावर नियंत्रणासाठी त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींपर्यंत संदेश रवाना केला आहे. प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांना आपसातील मतभेद पक्ष पातळीवर मिटविण्यास सांगितले आहे. याविषयी कोणत्याही कारणास्तव जाहीर विधान करू नये, अशी सूचना दिली आहे. काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी के. सी. वेणूगोपाल, सोनिया गांधीचे सचिव अहमद पटेल यांच्यामार्फत राहुल गांधींकडे त्यांनी तक्रार केली आहे.

देवेगौडांचा काँग्रेस श्रेष्ठींना इशारा

दरम्यान, दिल्‍ली दौर्‍यावर असणारे निजदचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार एच.डी.देवेगौडा यांनी राहुल गांधी व  इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली असून कर्नाटकातील घडामोडींबाबत चर्चा केली. सिद्धरामय्यांनी गटबाजी करून इतर ठिकाणी चर्चा सुरू केली आहे. समन्वय समितीचे ते अध्यक्ष असले तरी सर्वच विषयांत निर्णयावेळी त्यांचे मत जाणून घेण्याची गरज नाही. गटबाजी करणार्‍यांमुळे युती सरकारला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. वेळीच त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे. अन्यथा आगामी काळात सरकारला त्यांच्यापासून नुकसान होण्याची शक्यता असल्याचा इशारा देवेगौडांनी काँग्रेस वरिष्ठांना दिला.  पत्रकारांशी बोलताना देवेगौडांनी सिद्धरामय्यांच्या विधानाला जास्त महत्त्व देण्याची गरज नसल्याचे सांगितले. पक्ष पातळीवर सर्व समस्या मिटविल्या जातील. अनेकांनी वेगवेगळी विधाने केली आहेत. त्या सर्वांच्या विधानांवर प्रतिक्रिया दिली तर त्याचा वेगळाच अर्थ निघेल. कुमारस्वामींनाही याविषयी मौन बाळगण्याचा सल्‍ला दिल्याचे ते म्हणाले.